Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ ऑगस्ट, २०२६
चिखली नदीच्या पुराने आदिवासी वस्ती जलमय; दोन तरुणांनी केले अन्नदान, माणुसकीचा दिला आदर्श
अमळगाव (ता. अमळनेर), प्रतिनिधी :
दि. ३० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अमळगाव येथील चिखली नदीला मोठा पूर आला. नदीच्या पाण्याने मरीआई मंदिराजवळील आदिवासी भिल्ल वस्तीत प्रवेश केल्याने सुमारे ३५ ते ४० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. अचानक आलेल्या या पुरामुळे अनेक कुटुंबांचे अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपत्तीमुळे सुमारे दीडशेहून अधिक महिला, पुरुष आणि लहान मुले हतबल झाली होती.
संततधार पाऊस सुरू असतानाच गावातील गोविंदा चावरे आणि हेमंत महाले या दोन युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतीचा हात पुढे केला. स्वतःची आर्थिक परिस्थिती सामान्य असतानाही त्यांनी कोणत्याही मदतीची वाट न पाहता स्वतःच्या खिशातून खर्च करून सुमारे दीडशे पुरग्रस्तांसाठी अन्नाची व्यवस्था केली. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
पूराच्या पाण्याने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, चुली विझल्या आणि संसार उघड्यावर आला. अशा कठीण परिस्थितीत गोविंदा चावरे आणि हेमंत महाले यांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे पुरग्रस्तांच्या चेहऱ्यावर क्षणभर का होईना, आशेचे हास्य उमटले. त्यांच्या या उपक्रमाचे गावभर कौतुक होत असून नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान, चिखली नदीच्या पुराचा फटका यावर्षीच नव्हे तर मागील वर्षीही अमळगावातील व्यापारी व नागरिकांना बसला होता. अनेक दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, नुकसानग्रस्तांना अद्याप कोणतीही ठोस आर्थिक मदत मिळालेली नसल्याची खंत व्यापारी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरवर्षी पावसाळ्यात चिखली नदीला पूर येऊन गावातील घरे, दुकाने आणि रस्ते जलमय होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शासनाने तातडीने पूरनियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, नदी परिसराचे नियोजन करावे तसेच नुकसानग्रस्त व्यापारी व नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
"पावसाने झोडपले... पुराने डोळ्यांत आसवे आणली... पण गोविंदा चावरे आणि हेमंत महाले यांनी त्या आसवांना माणुसकीच्या स्पर्शाने आनंदाश्रूंमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला," अशा शब्दांत गावकऱ्यांनी या दोन्ही युवकांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा