Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६
दारूबंदीचा ठराव झाला; दारूविक्री मात्र सुरूच...
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण
परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने अवैध दारूविक्रीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव मंजूर करूनही गावात खुलेआम दारूविक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने माजी सैनिक किशोर शिवाजी मोरे व शेतकरीपुत्र ज्ञानेश्वर नवनाथ मगर यांनी बुधवार, दि. १२ ऑगस्टपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्न-पाणी त्यागून आमरण उपोषण सुरू केले आहे.
गावातील तरुणांनी एकत्र येत दारूबंदीचा निर्णय घेतला असून, गावातील सामाजिक वातावरण, तरुण पिढी आणि कुटुंबांचे हित लक्षात घेऊन अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या वतीने किशोर मोरे व ज्ञानेश्वर मगर हे उपोषणाला बसले आहेत.
शेळगाव ग्रामसभेत किशोर मोरे यांनी गावातील अवैध धंद्यांमुळे शांतता, सुव्यवस्था व सामाजिक सलोखा धोक्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, त्याचा परिणाम अनेक कुटुंबांवर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे गावातील सर्व अवैध व मानवी आरोग्यास घातक व्यवसाय तात्काळ आणि कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. ज्ञानेश्वर मगर यांनी ठरावास अनुमोदन दिल्यानंतर ग्रामसभेने तो मंजूर केला.
ग्रामसभेचा ठराव व निवेदन आंबी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह मोरे यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे निवेदन देऊन अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, यानंतरही गावात दारूविक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
उपोषणस्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक हरिभाऊ लांडे व दुय्यम निरीक्षक बी. ए. राख यांनी भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, “गावातील दारूविक्री पूर्णपणे बंद होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका किशोर मोरे व ज्ञानेश्वर मगर यांनी घेतली आहे.
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सतीश दैन, शहाजी मगर, शहाजी जगताप, विलास मोरे, कैलास शिंदे, महादेव शेवाळे, मोहन शिंदे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. गावातील तरुणांनी घेतलेल्या दारूबंदीच्या निर्णयाला ग्रामस्थांकडूनही पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी दिसून आले.
माजी सैनिक किशोर मोरे यांनी तब्बल १७ वर्षे देशसेवा केली आहे. देशसेवेनंतर आता गावातील अवैध दारूविक्रीविरोधात त्यांनी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले आहे. त्यांच्या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह मोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
ग्रामसभेचा ठराव, प्रशासनाकडे दिलेली निवेदने आणि कारवाईचे आश्वासन असूनही दारूविक्री सुरू असल्याचा आरोप होत असल्याने शेळगावात संतापाचे वातावरण आहे. गावातील दारूविक्री पूर्णपणे बंद होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी : शहर व परिसरात शनिवारी रात्री भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक ...
-
सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांची अटकपुर्व रद्द करत न्यायालयाने सिध्द केले , कायद्या पेक्षा कोणी मोठे नाही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे सुरु झालेल्या वेतनाला ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा