Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या रोजच्या कटकटीला कंटाळून संतापाच्या भरात हत्या केल्याची नातू-नातसुनेची कबुली; दोघे पोलिसांच्या ताब्यात.


संदीप अवधूत :-
सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे मंगळवारी मध्यरात्री वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने मानेवर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सखाराम गावित (६६) व त्यांच्या पत्नी बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सखाराम गावित व बायजाबाई गावित हे नेहमीप्रमाणे त्यांच्या राहत्या घरात झोपले होते. मंगळवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती सकाळी परिसरात पसरल्यानंतर पोलीस पाटील बापूराव भोये यांनी पोलिसांना कळविले.
माहिती मिळताच सुरगाणा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत अहिरे, उपनिरीक्षक मनोज कुवर, हवालदार शिवराम गायकवाड, गणेश आव्हाड, मनोज चव्हाण, रमेश चव्हाण यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन तपासासाठी आवश्यक पुरावे संकलित केले.दरम्यान, पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित व नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य मद्यपान करून दररोज शिवीगाळ व कटकट करीत असल्याने त्याला कंटाळून संतापाच्या भरात दोघांनी संगनमताने हत्या केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे करीत आहेत. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे, धनंजय शिलावटे यांच्यासह सुरगाणा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध