नंदुरबार :प्रतिनिधी (महेश पाटील) काँग्रेसचा बालेकिल्ला व गांधी परिवाराचे विशेष लक्ष असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांच्यासह नवापूर नगरपालिकेतील नगरसेवक व पंचायत समिती
सदस्य,सरपंच,सदस्य तथा पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर स्वार होणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त होतेय. येत्या दोन ते तीन दिवसात नवापूरला कार्यकर्ते समर्थकांच्या मेळावा घेऊन मुंबईत प्रवेश निश्चित मानला जात आहे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री तथा टॉप टेन खासदार ओळख निर्माण करणाऱ्या माणिकराव गावित यांचे सुपुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत हे नंदुरबार लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली परंतु, तिकीट न दिल्याने गावीत परिवार व त्यांचे कार्यकर्ते समर्थकांमध्ये मोठी नाराजी होती
काँग्रेस पक्षाकडून त्यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीत स्थान देण्याचे आश्वासित करण्यात आले होते. त्यानंतर भरत गावित यांनी नवापुरात समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळावा घेत काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले
गेल्या महिनाभरापासून भरत गावित भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली. त्यांनीही आता दोन-चार दिवसांमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल,माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खा. डॉ. सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची भेट घेतली. या भेटींमधून जवळपास भरत गावित भाजपाचा अश्वावर स्वार होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे
भरत गावित यांच्याकडून दुजोरा
गावित भाजपात दाखल होणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यम, सोशल मीडियावर रंगल्यानंतर त्यांच्याकडूनही ही प्रवेशाच्या दुजोरा मिळालेला आहे. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनानंतर त्यांच्या प्रवेश निश्चित मानला जात आहे.
प्रवेशा आधी नवापूरला मेळावा
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्या भाजप प्रवेश अधिवेशनानंतर निश्चित जरी मानला जात असला तरी नवापूरला येत्या दोन-तीन दिवसात समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे
नगरसेवक,पं.स सदस्य रांगेत
नवापुर नगरपालिकेतील काही नगरसेवक, पंचायत समितीचे काही सदस्य विविध ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. नवापूर नगरपालिकेतील अनेक नगरसेवक तसेच विविध ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच व काही सदस्य भरत गावित यांचे खंदे समर्थक आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा