Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
बँक कर्मचारी तीन दिवस संपावर; सलग पाच दिवस व्यवहार ठप्प राहणार
________________________________
देशातील चार वेगवेगळ्या बँक अधिकाऱ्यांच्या संघटनानांनी तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच दोन दिवसांची आठवड्याची सुटी जोडून असल्याने याचा परिणाम व्यवहारांवर होणार आहे. यामुळे लवकरात लवकर नागरिकांना कामे उरकावी लागणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारने देशातील 10 सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी ऑफिसर्स ट्रेड यूनियनने संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिस या चार संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. बँकांचे कर्मचारी संपावर गेले तर ग्राहकांची कामे खोळंबणार आहेत. कारण 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस हा संप पुकारण्यात आला आहे. यानंतर 28 तारखेला चौथा शनिवार असल्याने साप्ताहिक सुटी असणार आहे. अशा सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे 23 आणि 24 सप्टेंबर या दोन दिवसांत कामे आटोपावी लागणार आहेत. बँकांच्या विलिनीकरणाशिवाय अन्य मागण्याही करण्यात येणार आहेत. यामध्ये आठवड्याला सहा दिवसांच्या कामकाजाऐवजी पाच दिवसांचा आठवडा करणे, कॅश ट्रान्झेक्शनचा वेळ कमी करणे, ग्राहकांच्या सेवाकरामध्ये घट आणि पगारामध्ये बदल अशा या मागण्या असणार आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे
सांभाळ करणाऱ्या अपत्याला पालक देऊ शकतात अधिक संपत्ती- सर्वोच्च न्यायालय
________________________________
वृद्ध पालक त्यांचा सांभाळ करणाऱ्या अपत्याला संपत्तीत अधिक वाटा देऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. देखभाल करणाऱ्या अपत्याला त्याच्या भावंडांच्या तुलनेत जास्त संपत्ती दिली जाऊ शकते, असं न्यायालयानं एका प्रकरणात निकाल देताना म्हटलं. एखाद्या वृद्ध पालकानं अशा प्रकारे अपत्याला संपत्तीत अधिक वाटा दिल्यास त्याला वयाचा फायदा घेऊन संपत्ती नावे केली असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. १९७० च्या दशकातील एका प्रकरणात न्यायालयानं हा निर्णय दिला.भावंडांमध्ये चाललेल्या संपत्तीच्या वादात न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि इंदिरा बॅनर्जी यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. 'कोणत्याही महत्त्वपूर्ण साक्षीशिवाय या निष्कर्षावर (पालकांच्या वयाचा फायदा घेऊन संपत्ती नावे करणे) पोहोचणं योग्य होणार नाही. त्यामुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो. एखादं अपत्य आई वडिलांचा नीट सांभाळ करत नसेल, मात्र त्याच व्यक्तीचं भावंड पालकांची नीट काळजी घेत असेल, तर त्या भावंडाला पालक संपत्तीत जास्त वाटा देऊ शकतात,' असं न्यायालयानं निकालात म्हटलं. एखाद्या अपत्यानं केवळ संपत्तीत अधिक वाटा मिळवण्यासाठी आपल्या मातापित्याची काळजी घेतली, असं म्हटलं जाऊ शकत नाही, हे देखील न्यायालयानं स्पष्ट केलं. संपत्तीच्या वाटणीवर गेल्या ५ दशकांपासून एक प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर वर्षभरातच भावांमधून वाद सुरू होता. वडिलांनी त्यांच्या संपत्तीतला मोठा वाटा एका मुलाला दिला होता. वडिलांच्या वयाचा गैरफायदा घेऊन संपत्तीतला अधिक वाटा घेतल्याचा आरोप इतर भावंडांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्रन्यायालया पाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानंही भावंडांच्या विरोधात निकाल दिला.
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची राजकीय इनिंग, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश.
_______________________________
पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमक फेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी सहा वाजता प्रदीप शर्मा हातावर शिवबंधन बाधणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीसाठी नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नालासोपार्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मुद्दा लक्षात घेता प्रदीप शर्मा यांना शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं.
अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात प्रवेश करणार
________________________________
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर आज उदयनराजे भाजपात प्रवेश करतील. त्यासाठी जलसंपदा गिरीश महाजन त्यांना घेऊन दिल्लीला जाणार आहेत. आज रात्री भाजपाचे अध्यक्षअमित शहांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल. यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.उदयनराजे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटदेखील घेतली होती. यानंतर राष्ट्रवादीनं उदयनराजेंना पक्षात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. उदयनराजे काल राष्ट्रवादीचे अध्यक्षशरद पवारयांच्या पुण्यातील निवासस्थानी गेले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मुंडेंनी उदयनराजे राष्ट्रवादीतच राहतील, असा विश्वासदेखील व्यक्त केला होता.शरद पवारांच्या आधी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत उदयनराजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन्ही भेटींचा कोणताही उपयोग झाला नाही. उदयनराजे यांनी अनेकदा स्वपक्षावर टीका केली आहे. अनेकदा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वालादेखील जमलेलं नाही. त्यामुळेच त्यांना भाजपात घेतलं जाऊ नये, असं पक्षातल्या एका गटाचं मत होतं. या कारणामुळे उदयनराजेंचा पक्ष प्रवेश रखडला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेनंतर केदारनाथची गुहा 'हाऊसफुल'!
________________________________
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर येथील एका एका गुहेत ध्यानधारणा केली होती.नरेंद्र मोदींच्या या ध्यानधारणेचे वृत्त जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि केदारनाथ मधीलही गुहा चर्चेत आली होती. सध्या हीच गुहा ध्यानधारणा करण्यासाठी हाऊसफुल होत आहे. या गुहेसाठी ऑक्टोबरपर्यंत बुकिंग झाले आहे. त्यामुळे केदारनाथमधील ही गुहा आता विशेष पर्यटनस्थळ बनली आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी म्हणजेच 18 मे रोजी केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर रात्रभर एका गुहेत ध्यानधारणा केली. ही गुहा मुख्य केदारनाथ मंदिरापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर आहे.
नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेनंतर या गुहेत जाणाऱ्यालोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 65 दिवसांत याठिकाणी 46 भाविकांनी ध्यानधारणा केली आहे. तर, ऑक्टोबरपर्यंत गुहेत धानधारणा करणाऱ्या भाविकांनी बुकिंग केले आहे. गढवाल मंडळ विकास निगमच्या माहितीनुसार, आतापर्यंत या गुहेच्या माध्यामातून 95 हजार रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. या गुहेत धानधारणा करणाऱ्या भाविकांना प्रतिरात्र 1500 रुपये आणि प्रतिदिन 990 रुपयापर्यंत शुल्क आकारण्यात येत आहे. केदारनाथमधील ही गुहा समुद्रसपाटीपासून 12 हजार फूट उंचीवर आहे. एक भलामोठा दगड कापून ही गुहा तयार करण्यात आली आहे. या गुहेत वीज, पाणी यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच, या गुहेला एक खिडकी आहे, जिथून केदारनाथ मंदिराचे अत्यंत विलक्षण रुप पाहायला मिळते. ही गुहा पंतप्रधान मोदींनी दौरा करण्याच्या काही महिन्यांपूर्वी तयार झाली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा