Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ सप्टेंबर, २०१९

रासायनिक कंपनीच्या स्फोटाची सखोल चौकशी करणार. : पालकमंत्री दादाजी भुसे




वाघाडी येथे घटनास्थळी भेट देवून केली पाहणी.......




स्फ़ोटात जे कामगार जखमी झाले आहेत त्यांचा संपुर्ण उपचाराचा खर्च शासनाच्या वतीने करण्यात येणार असून या अपघात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबीयांना रु.5 लाखाची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.


धुळे :शिरपूर /प्रतिनिधी:धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे येथे स्फोट झालेल्या रासायनिक कंपनीच्या घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
 
वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे येथील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर 58 जण जखमी झाले आहेत. जखमींवर शिरपूर व धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. भुसे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी करीत बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री श्री. भुसे यांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात जावून जखमींची चौकशी केली. तसेच रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुव वाघ यांच्याशी चर्चा करून जखमींवर आवश्यक ते उपचार करावेत, असे निर्देश दिले. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, या घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या स्फोटानंतर लागलेली आग विझविण्यासाठी ठिकठिकाणचे अग्निश्यामक दलाचे बंब मागविण्यात आले आहेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक व स्थानिक नागरिकांनी मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जखमींवर शासकीय खर्चाने औषधोपचार करण्यात येतील व मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना रु.5 लाखाची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्री श्री. भुसे यांनी धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध