Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१९

”शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन”

मुंबई: महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले आहे. बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजित बिचुकले यांनी देखील विधानसभेच्या 288 जागा लढणार असल्याचे सांगितले होते. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं आश्वासन अभिजित यांनी दिले आहे. 

अभिजित बिचुकले यांनी सांगितले की, साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणुक आणि आगामी विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या मैदानात उतरणार आहे. तसेच साताऱ्यातील नागरिकांनी शरद पवार यांना मोठं केलं असून मलाही सातारकर मोठं करतील असा अभिजित यांनी विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे शरद पवारांना देशाचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे हे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी स्वत: पंतप्रधान होऊन पूर्ण करुन दाखवेन असं देखील अभिजित बिचुकलेंनी यावेळी सांगितले. 


--------------------------------------------------------------


भाजपा अन् शिवसेनेच्या उमेदवार यादीत घोळ झाल्याचं दिसून येत आहे. इचलकरंजी मतदारसंघातून दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतरशिवसेनेनंही आपल्या 70 उमेदवारांची नावासह यादी जाहीर केली. या यादीत दोन्ही पक्षांकडून एकाच मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. 

शिवसेनेच्या यादीत अनुक्रमांक 48 नुसार इचलकरंजी मतदारसंघातून हातकणंगलेचे आमदार सुजित मिनचेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, भाजपाच्या यादीत अनुक्रमांक 121, मतदारसंघ क्रमांक 279 मध्ये इचलकरंजीतून सुरेश हळवणकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीतील एकाच मतदारसंघातून दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना संधी कशी काय देण्यात आली? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.  

हातकणंगलेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुजित मिनचेकर यांना इचलकरंजीतून उमेदवारी घोषित झाली असून भाजपच्या यादीतसुद्धा इचलकरंजीमधून सुरेश हळवनकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं समोर आलंय. याबाबत सुजित मिचनेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ही टायपिंग मिस्टेक असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तसेच, याबाबत मी मातोश्रीवर फोनवरुन कळवल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे इचलकरंजी हा मतदारसंघ भाजपालाच देण्यात आला असून हातकणंगले येथून सुजित मिनचेकर यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपापाठोपाठ शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 70 उमेदवारांचा समावेश आहे. तर भाजपाच्या पहिल्या यादीत 125 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामध्ये 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 


मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १२५ जणांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. मात्र या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांचा पहिल्या यादीत समावेश नाही. मात्र या यादीतील एका नावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

शिवसेना-भाजपा युतीतील कळीचा मुद्दा असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी/पीए आहेत. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेनं औसामध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नव्हती. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यासाठी औसा मतदारसंघ मागून घेतला.

शिवसेनेला दोनदा मिळालेला विजय सोडल्यास बाकीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं औसात वर्चस्व राखलं. सध्या काँग्रेसचे बसवराज पाटील औसाचं प्रतिनिधीत्व करतात. बसवराज पाटील यांनी २००९ मध्येही विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपकडून पाशा पटेल निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांना पराभव पत्करला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याचे ओएसडी बाजी मारणार की बसवराज पाटील वर्चस्व राखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध