Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ६ जुलै, २०२६

चिमठाणेजवळ एसटी बस–ट्रकची समोरासमोर धडक; चालक गंभीर जखमी, ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी



चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई
धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले असून, ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने दोन्ही वाहनांचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२० बीएल-२६०० क्रमांकाची एसटी बस धुळे येथून नंदुरबारकडे जात होती. बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. त्याचवेळी एमएच-२१ बीएच-८९७९ क्रमांकाचा ट्रक दोंडाईचा येथून सोनगीरकडे जात असताना दराणे फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात एसटी बसचे चालक अनिल देवरे यांचे दोन्ही पाय केबिनमध्ये अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी आणि मदत पथकाने तातडीने त्यांची सुटका करून उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अपघातात बसमधील ७ ते ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांनाही प्राथमिक उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. एका बाजूला खोल उतार, दुसऱ्या बाजूला नव्याने तयार करण्यात आलेला काँक्रीट रस्ता तसेच रस्त्यालगत टाकण्यात आलेल्या मातीमुळे वाहनांना एकमेकांना सुरक्षितरीत्या पास होण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे काही काळ धुळे–नंदुरबार महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध