Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना पीकविमा मिळण्यासाठी आ. काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 रोजी धडकणार मोर्चा






शिरपूर:पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत शिरपूर तालुक्यातील 12,541 लाभार्थी पिक विमा धारक शेतकरी बांधवांना व 410 फळ पिक विमा धारक लाभार्थी शेतकरी बांधव यांना तातडीने पिक विम्याची रक्कम मिळावी यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 जानेवारी रोजी मोर्चा धडकणार
आहे.

शिरपूर तालुक्यातील पिकनिहाय बाधित शेतकरी संख्या 12,541 आहे. कापूस 6801 शेतकरी, मूग 2305, मका 1129, उडीद 897, ज्वारी 634, बाजरी 291, सोयाबीन 404, भुईमूग 31, तूर 33, तीळ 3, कांदा 16 असे एकूण 12,541 शेतकरी बांधवांना तसेच फळ पिक बाधित शेतकरी बांधव 410 आहेत.

सर्व शेतकरी बांधवांना शासनाकडून तातडीने त्यांची पिक विमा रक्कम मिळावी यासाठी आमदार काशिराम पावरा यांच्या वतीने दि. 16 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना दिलासा न मिळाल्यास मोर्चा काढण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

त्यानुसार शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नसल्याने दि. 29 रोजी शेकडो शेतकरी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेवून आपल्याला तातडीने पिक विमा मिळावा यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करणार आहेत.

शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष के.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 29 जानेवारी रोजी मोर्चा धडकणार आहे.


गेल्या वर्षी 8 कोटी 6 लाख रुपयांचा फळ पिक विमा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला होता. यांतील पहिल्या हप्त्याचे 4.03 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यांवर जमा झाले होते.
पंतप्रधान फळ पिक विमा योजना अंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना 2018-19 मध्ये “आंबिया बहार” साठी लागू करण्यात येवून महाराष्ट्र शासनाच्या वतीने व ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मार्फत गेल्या दीड महिन्यांपूर्वी फळ पिक विमा मंजूर करण्यात आला होता. या विक विमा योजनेतून केळी पिकाचे 403 लाभार्थी शेतकरी बांधव, पेरु पिकाचे 1 व डाळींब पिकाचे 6 लाभार्थी असे एकूण 410 लाभार्थी शेतकरी बांधवांना प्रत्येकी प्रति हेक्टर रु. 66,000 प्रमाणे पिक विमा रकमेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. 4 कोटी 3 लाख रुपये एवढी रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा झाली असून उर्वरीत दुसरा हप्ता रु. 66,000 चा मिळणे बाकी आहे. उर्वरीत रक्कम लवकर मिळावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी देखील आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने 9 कोटी रुपये पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांना प्राप्त झाली होती.
यावर्षी मात्र पिक विमा मिळण्यात होणारी दिरंगाई शेतकरी बांधवांसाठी खूपच मारक ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध