Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

अजुनही आठवतोय पुर्वीचा माझा गांव... श्री अर्जुनभोई



भूतकाळात डोकावल्याशिवाय मजा काही मिळत नाही. 
मागे वळून पाहिल्यावर हसावं का रडावं कळत नाही. 
साऱ्याच गोष्टी मध्ये खूप खूप बदल झाले. 
पहिल्यापेक्षा प्रत्येकाला नक्कीच बरे दिवस आले. 
खरं वाटणार नाही पण एवढं सगळं बदललं. 
निगरगट्ट माणूस सुद्धा मुळा सकट हादरलं. 
शाळेतून घरी गेल्या गेल्या दप्तर कोनाड्यात जायचं. 
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना बाहेर काढल जायचं. 
अहो, दप्तर म्हणजे काय? वायरची पिशवी असायची. 
जुन्या फाटक्या पुस्तकासोबत फुटकी पाटी दिसायची. 
अभ्यास कर म्हणून कुणी म्हणलंही नाही. 
अन मार्क कमी पडले म्हणून हाणलंही नाही. 
कोणताही ऋतू असो काळपट चहा असायचा. 
तडकलेल्या बशीवर कानतुटका कप दिसायचा. 
बारा महिने अनवाणी पाय चप्पल म्हणजे श्रीमंती. 
पायाला चटके बसायचे पण सगळ्या गावात हिंडायचे. 
कुणाचं गुऱ्हाळ लागलं की चला रस प्यायला. 
खळे दळे लागले की चालले शेतात झोपायला. 
मरणाची गरिबी होती पण मजा मात्र खूप. 
लग्नाकार्यात माणसं नाती व्हायची एकरूप. 
अमावस्येच्या दिवशी पोरं मारुतीच्या पारावर. 
नारळाच्या टूकड्यासाठी एकमेकाच्या अंगावर. 
ओ मामा द्यानं ओ मामा द्यानं एकच गलका व्हायचा. 
रेटारेटी केल्यामुळं सदरा टरकून जायचा.
पाहुण्याला पाहुणचार म्हणून खिचडी भजे व्हायचे. 
तेवढ्यातच सा-यांचे डोळे भरून यायचे.
तेलच्या-गुळवणी आणि पापडांची काय मामलात होती. 
तरीही त्या माणसांमध्ये माणुसकी होती. 
रात्र रात्र गप्पा व्हायच्या डोळ्यात यायचं पाणी. 
आडपडदा न ठेवता दुःखाची व्हायची गाणी. 
कुठे गेला तो साधेपणा कुठे गेलं ते सुख?
खरं सांगा पहिल्या सारखी लागते का आता भूक? 
इतकुसाक पेढ्याचा तुकडा मिडकू मिडकू खायचा. 
कधी तरी कुणी तरी प्रसाद म्हणून द्यायचा. 
सारं सारं संपून गेलं आता पैसा बोलत असतो. 
माणूस मात्र भ्रमिष्टा सारखा खोटं खोटं डोलत असतो. 
पेढ्याच्या बाॅक्सकडे ढुंकूनही कुणी पहात नाही. 
एवढंच काय पहिल्या सारख्या मुंग्याही त्याला लागत नाही. 
सुखाचं बोट कधी सुटलं आपल्या लक्षात आलं नाही. 
श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं तसं काही झालं नाहीे. 
ते सुख आणि वैभव पुन्हा घरात येईल का? 
चिरेबंदी वाड्या मधून हसण्याचा आवाज येईल का?
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी म्हणजेच बालपणीचा काळ सुखाचा


1 टिप्पणी:

प्रसिद्ध