Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

संपूर्ण हक्काची लढाई एकतेतुन करु या:श्री अर्जुनभोई,मुंबई



प्रतिनिधी:हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या, मोहिमा आखल्या, अनेक परकीय आक्रमणे चतुराई आणि शौर्याने परतवून लावली. अशाच मोहिमेवर असताना एका वृद्ध महिलेच्या दोन वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे खाडकन उघडले. त्या वृद्ध महिलेच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी मोठा पराक्रम गाजवला. नेमके काय घडले जाणून घेऊ या.

छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर गेले होते. मात्र अपेक्षित यश त्यांना मिळत नव्हते. दोन दिवसानंतर शिवाजी महाराज परत फिरले. शिवाजी महाराज परतत असताना, त्यांना वाटेत घनदाट जंगल लागले आणि महाराज रस्ता चुकले. जंगलातून मार्ग काढताना एका वृद्ध महिलेच्या झोपडीपाशी येऊन थांबले. दिवसभर उपास घडल्याने महाराजांना भरपूर भूक लागली होती. न राहून महाराजांनी त्या वृद्ध महिलेला भोजनाची व्यवस्था करण्याची विनंती केली. वृद्ध महिलेकडे अन्नधान्याची वानवा होती. तरीही घरात असलेल्या काही गोष्टी वापरून त्यांनी महाराजांना आणि मावळ्यांना मऊसर भात वाढला.

शिवाजी महाराजांना भूक एवढी असह्य झाली होती की, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जेवायला सुरुवात केली. भात एवढा गरम होता की, महाराजांच्या बोटांना चटका बसला. महाराजांनी हाताला फुंकर मारत चटका शांत करण्याचा प्रयत्न केला. जवळ बसलेली वृद्ध महिला शिवाजी महाराजांचे वर्तन पाहत होती. तिला राहावले नाही आणि ती म्हणाली की, बालका, तुझा चेहरा शिवाजी सारखा आहे. तुझी बुद्धीही शिवाजी सारखी असल्याचे दिसतेय. तुझे वर्तनही शिवाजी सारखे वेडेपणाचे आहे. वृद्ध महिलेचे हे बोल ऐकून शिवाजी महाराजांना आश्चर्य वाटले. आजीबाई, शिवाजी अत्यंत बुद्धीमान आहे असे मानणाऱ्या अनेक विद्वानांना, बुद्धीवंतांना मी ओळखतो. मग, शिवाजीचे वर्तन वेडेपणाचे आहे असे आपल्याला का वाटते? असा प्रश्न शिवाजी महाराजांनी तिला विचारला.
 
वृद्ध महिला उत्तरली की, तुम्हाला जेवण वाढले तेव्हा पानात असलेली आणि गार झालेली कंदमुळे खायची सोडून तुम्ही थेट गरम भात जेवायला घेतला. गरम भातामुळे बोटांना चांगलाच चटका बसला. हे वर्तन वेडेपणाचे नाही तर काय? शिवाजी देखील असाच वेडेपणा करत आहे. दूर अंतरावर असलेले छोटे-छोटे किल्ले काबीज करायचे सोडून सरळ सरळ मोठ्या किल्ल्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी लढाई करतोय. पराभव, निराशा पदरी पडणारच. 

वृद्ध महिलेच्या या वाक्यांनी शिवाजी महाराजांचे डोळे खाटकन उघडले, डोक्यात लख्ख प्रकाश पडला. मोठा विजय मिळवण्या आधी छोट्या-छोट्या चढाया यशस्वी करायला हव्यात. छोट्या किल्ल्यांवर विजय मिळवून हळूहळू आपला साम्राज्य विस्तार करत मोठे किल्ले काबीज करायला हवेत अशी मोठी शिकवण शिवाजी महाराजांना मिळाली. याच शिकवणीच्या जोरावर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना शेकडो किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली सुमारे ४०० किल्ले होते असे सांगितले जाते.

समाज बंधु आणि भगिनींनो,आपण ही आप आपल्यातील सामाजिक मनभेदाची, मतभेदाची मुळे समुळ नष्ट करु या आणि विशाल भोई आणि त्याच्या तत्सम जमातींना एका ठिकाणी करुन आपल्या अधिकाराची भाषा महाराष्ट्र सरकार समोर एकत्रितरित्या करून आपला ही सामाजिक विकास करुन घेऊ या. जय महाराष्ट्र, जय भोई तत्सम जमातीराज.


1 टिप्पणी:

  1. आशी आहे कहार-भोई समाजाची आथिर्क परिस्थिती फार बिकट आहे त्यांची आथिर्क परिस्थिती अत्यंत बिकट आहे नैसर्गिक मासे वाबंट ,भलू ,चिलापी ,गुगल मरळ ,आहेत. सरकारी मासे कटला ,राहू,सुपर,मिरगल इत्यादी आहे मासेमारी करून कहार-भोई समाज जगत आहे मी अर्जुन कचरे शासनास सांगू इच्छितो की कहार-भोई हा समाज शिक्षणापासून व आरक्षणापासू वंचित आहे त्यांना कुठलीही योजना नाही मी शासनास सांगू इच्छितो की कहार-भोई समाज मागासअसलेल्या समाज आहे व कहार-भोई समाजाचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसाय आहे व तलावाच्या कडेला कोपटया व घरे बांधून राहतो ठेकेदार मच्छिमारांंची फसवणूक करतात म्हणून शासनास सांगू इच्छितो की ठेकेदार मच्छिमारांंची फसवणूक करतात त्यांनी धरलेले मासे कमी भावात गुंडगिरी करुन घेतात व नाही दिल्यास त्यांच्यावर कोठे गुन्हेे दाखल करण्यात येते व संस्थेवर आलेले तलाव सुद्धा सचिव व चेअरमन सभासदांची फसवणूक करतात म्हणून शासनास सांगू इच्छितो फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावे सर्व तलाव शासनामार्फत खुले करण्यात यावे व मत्स्यविभागास कळविण्यात यावे की सर्व तलाव शासनामार्फत खुले करण्यात यावे कारण कोणत्याही ठेकेदार सोबत व संस्थेवर वाद होणार नाही ही शासनास माझी विनंती आहे आपला समाज सेवक कचरे अर्जुन रा धुनकवाड तलाव ता धारूर जिल्हा बीड राज्य महाराष्ट्र .

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध