Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मार्च, २०२०

मैत्री एक ध्यासपर्व.. श्री गुलाब सोनोने



यवतमाळ प्रतिनिधी:मैत्री कुणाशी करावी ती केली जाते की आपोआप होते हा अगदीच संशोधनाचा मुद्दा आहे, किमान मला तरी असं वाटतं की मैत्री ठरवून केली जात नाही, ती आपसूकच होत असते कारण मैत्रीला कोणताही रंग,रूप,गरिबी श्रीमंती यांची झालर नसते. समजदारीचे पाळेमुळे जितकी खोलवर असतात, तितकी मैत्री निरागस, समृध्द आणि प्रगल्भ असते.

मुळातच ती ठरवून केलेली नसल्यामुळे एकमेकांना जपण्याचा प्रयत्न करायचा असतो, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती असतात, साहजिकच प्रत्येकाचे विचार भिन्न असतात, परंतु दोन भिन्न विचारामधून *एक सुवर्णमध्य* काढणे जरुरी असते आपल्या विचारांना इतरांच्या गळी उतरवत असताना त्यांच्या भिन्न विचारांचा सुद्धा आदर केला पाहिजे. अनेक जणांना असे वाटते की, दोन सजातीय विचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये लवकर  मैत्री होते , आणि बरीचशी टिकते, परंतु माझं मत थोडं यापेक्षा वेगळं आहे,  मैत्रीला चुंबकत्वाचे नियम लागू होतात  मैत्री हे रसायन वेगळंच आहे, रंगभेदापलीकडच अधिष्ठान तिला आहे, नुसते विचार सारखे आहेत म्हणून निखळ मैत्री असते या विधानावर माझा अजिबात विश्वास नाही, कारण

मैत्री श्वास  आहे
मैत्री आस आहे
हुरहूर लावणारा
अनोखा ध्यास आहे

एखादी व्यक्ती आपली जिवलग कधी झाली हे कळत सुद्धा नाही, हीच निखळ मैत्रीची व्याख्या आहे... 

पौराणिक काळातील श्रीकृष्ण सुदामा यांची मैत्री जगविख्यात आहे, आधुनिक काळात भौतिक साधनांची रेलचेल आहे, त्यामुळे नात्यातील लवचिकता वाढलेली आहे, आज जिवलग असलेल्या मित्रांना असे वाटते की आपल्या मित्राने आपले फक्त गुण गायला हवेत, कमतरता दाखवू नये, सर्वांना मैत्री कशी छापखान्यातील गणपतीसारखी एकजीव असावी एका सारखाच दुसरा असावा, असा जेव्हा विचार येतो तेव्हा ती मैत्री भौतिक साधनांच्या बजबजपुरीत बरबटलेली असते हे निश्चित ...

रुसवा, फुगवा हा मैत्रीचा स्थाईभाव आहे पण किती ताणायचं, आणि अबोल्याचं रूपांतर संवादात करायचं हे तर कळायला हवं.. त्यासाठी समोरील व्यक्तीच्या मनाचा अंदाज अचूकपणे घेता यायला हवा.. मैत्रीमध्ये बरेचदा खटके उडतात आणि हे स्वाभाविक आहे, रागावणे, चिडणे, दोन दोन, आठ आठ दिवस अबोला धरणे, फोन न घेणे, व्हाट्सअप, फेसबुक आणि अन्य संवादाची माध्यमे बंद (ब्लॉक) करणे असे प्रकार अवलंबिले जातात..त्यामुळे दुरावा वाढण्याची शक्यता जास्त असते.. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती वर आपला हक्क दाखवत असतो म्हणून मला जास्त वेळ द्यावा, असे साहजिकच वाटत असेल, तर त्यात वेगळं अस काहीच नाही तीच व्यक्ती अमुक तमुक करू नको असे सल्ले देतो, तेव्हा तो त्याचा राग नसून जिव्हाळा आहे, हे समजून घेतले पाहिजे, रुसवा फुगवा, राग अनुराग नसेल तर मैत्री एक निर्जीव सांगाडा होईल, फक्त एकमेकांना जपायला हवं तुटेपर्यंत ताणायचं नाही हे साधं सारसुत्र ज्याला कळलं त्याची मैत्री कधीही तुटत नाही, हे सत्यविधान आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध