Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

जळगाव महापौरांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा



• प्रत्येक परिसराचा एक व्हाट्सअँप ग्रुप तयार होणार गटारी
• मोकळ्या जागा स्वच्छतेच्या सूचना

जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना राबविण्यासाठी शुक्रवारी महापौर यांनी सर्व आरोग्य निरीक्षकांकडून आढावा घेतला. साथरोग नियंत्रणासाठी तसेच गटारींच्या स्वच्छतेसाठी वेळीच कामाला सुरुवात करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.

आरोग्य विभागाचे अधिकारी व आरोग्य निरीक्षकांची बैठक शुक्रवारी मनपात महापौर भारती सोनवणे यांनी बोलावली होती. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, चेतन सनकत, शहर अभियंता सुनील भोळे आदी उपस्थित होते.

डॉक्टरांचा व्हाट्सअँप ग्रुप तयार करावा
कोणतीही साथ रोग आल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरांना समजते. त्यामुळे प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने त्यांच्या परिसरातील डॉक्टरांचा एक ग्रुप तयार करावा. त्यात महापौर व स्वीय सहाय्यकांना देखील सामाविष्ट करावे. जेणेकरून आजाराची माहिती लागलीच मिळेल व वेळीच योग्य त्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील, असे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

गटारींची सफाई लवकरात लवकर करा
शहरातील उपनाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आलेली आहे. उपनाल्यांपेक्षा लहान असलेल्या मोठ्या गटारी लवकरात लवकर नाला एस्केवेटर मशीनने साफ कराव्या. इतर प्रमुख गटारींची देखील लवकर साफसफाई करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या.

घंटागाडीचे मिनीट टू मिनीट नियोजन, ओपन स्पेसची स्वच्छता
शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा संकलनासाठी घंटागाडी फिरवताना वेळेचे नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांना कचरा देण्यास सुलभ होईल. प्रत्येक परिसरात, चौकात घंटागाडी वेळीच पोहचण्याची वेळ निश्चित असावी यासाठी घंटागाडीचे मिनीट टू मिनीट नियोजन करा, असेही महापौरांनी सूचित केले. तसेच शहरातील मनपा मालकीच्या मोकळ्या जागांची साफसफाई करावी, असेही महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध