Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ जुलै, २०२०

कोरोनाने शहरातून गावाकडे आलेले लोक रमले शेती कामात..!



सत्रासेन ता चोपडा सुभाष पाटील:साडेतीन महिन्यांपासून देश, राज्य, जिल्हा, तालुक्यात लॉकडाऊन आहे.कोरोना संसर्गाचा धोकाही असल्याने  चोपडा तालुक्यातून मोठ्या शहरात गेलेले शेकडो लोक आपल्या मूळ गावी परतले आहेत. 

त्यांना कामाची गरज असल्याने शहरात मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांच्या आता तिफण,चाढ,मोगडा,औषधी फवारा, खते, खुरप हाती आले आहे. सध्या शेतीची कामे गतीने सुरू असून अनेकजण आपल्या घरच्या शेतीत तर काहीजण मजुरीने इतर शेतात काम करताना दिसत आहेत.

गावात हाताला काम मिळत नाही जास्त उत्पन्न निघत नाही कमी शेतीत जास्त सदस्यांचा उदरनिर्वाह होत नाही शिक्षणाची सोय नाही अशा एक ना अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील शेकडो तरुणांनी शहराचा रस्ता धरला होता. शहरांनीही त्यांना रोजीरोटी देत आपलेसे करून घेतले होते. 

सणसुद,लग्न कार्य आदी कौटुंबिक कार्यक्रमा करिता येणारी शहरातील ही मंडळी शेतीकामापासून दूरच होती परंतु कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊन झाले आणि शहरात गेलेल्या या मंडळींनी गावचा रस्ता धरला. प्रारंभीचा काळ घरातच गेला असला तरी लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाचा धोका वाढतच असल्याने शहरांमधील जनजीवन अद्याप सुरळीत झालेले नाही. 

शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असले तरी अद्याप गावाकडे आलेले सर्व लोक शहरात परतलेले नाहीत. शाळा सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थीही गावातच आहेत. यादरम्यानच गाव शिवारात शेती कामांनी वेग घेतला आहे. हल्ली शेती कामासाठी मजुरांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देत विनंती करून मजुरांना शेतात कामाला घेऊन जावे लागायचे. परंतु यावर्षी चित्र बदलल्याचे दिसत आहे. गावात मजुरांची कमी नसून शेतीची कामे गतीने होत आहेत. कंपनीत यंत्राद्वारे काम करणारे तरुण, प्रौढ आता शेतामध्ये घाम गाळू लागले आहेत. 

अनेकांच्या घरी स्वतःची शेती आहे ते कुटुंबातील इतर सदस्यांना मदत करत आहेत तर काहींनी सरळ मजुरी सुरू केली असून यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळू लागले आहे. शेतकऱ्यांनाही मजूर गावातच मिळू लागल्याने कामे गतीने होऊ लागली आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध