Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ जुलै, २०२०

जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी..! जिल्हाधिकारी संजय यादव..!


धुळे, दि.8 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत कोविड केअर सेंटरमध्ये मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देतानाच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (कोविड 19 समन्वयक), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी तथा कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, अपर तहसीलदार संजय शिंदे (धुळे शहर), आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. ही काळजीची बाब असून मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वंकष प्रयत्न करावेत.

धुळे महानगरपालिका क्षेत्रात दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने, आस्थापना खुली ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. त्यानंतरही काही आस्थापना सुरू राहतील, अशा आस्थापनांसह विनाकारण आणि मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तींविरुध राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करावी. कोविड केअर सेंटरसाठी नियुक्त शिबिरप्रमुख आणि तालुकास्तरावरील नोडल अधिकाऱ्यांनी आणखी सतर्क होणे आवश्यक आहे. याशिवाय संशयित रुग्णांचे स्वॅब घेतल्यानंतर ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे आढळून येणार नाहीत, अशा रुग्णांच्या बाबतीत भारतीय वैद्यकीय परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

कोरोना विषाणूचे रुग्ण हाताळताना वापरलेल्या पीपीई कीटची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावावी. आरोग्य यंत्रणेसाठी तंत्रज्ञ, तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णालयांसह आवश्यक मनुष्यबळासाठी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू करावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आयसीयू कक्ष लवकर कार्यान्वित होईल, असे नियोजन करावे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय व अन्य रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा असलेल्या खाटाही तत्काळ कार्यान्वित कराव्यात, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतन स्वॅब नमुन्यांचे अहवाल तातडीने मिळतील, अशी व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी तांत्रिक मान्यतेसह प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख, पोलिस अधीक्षक श्री. पंडित, अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे आदींनी भाग घेतला, तर कोरोना विषाणूवरील रुग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचाराबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी माहिती दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध