Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या योगदानाची इतिहासात नोंद होणार..!पालकमंत्री अब्दुल सत्तार : 100 बेडच्या डेडिकेटेड कोविड सेंटरचे उदघाटन..!



धुळे।प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात हिरे मेडिकल कॉलेजचा संपूर्ण भार आपल्याकडे घेवून जवाहर मेडिकल फाउंडेशनने शासनाला सहकार्य केलेले आहे. परंतु केवळ सात दिवसात संपूर्ण सुविधांनी युक्त 100 बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारून मोठे योगदान दिलेले आहे. जवाहर फाउंडेशनच्या या कार्याची इतिहासात नोंद होईल असे मत धुळे जिल्हयाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडले. जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या 100 बेडच्या कोविड सेंटरच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.भाईदास पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, आयुक्त अजीज शेख, सीईओ वान्मती सी. अप्पर पोलिस अधिक्षक डॉ.राजू भुजबळ, उपायुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या सहसचिव संगीता पाटील, ममता पाटील, अधिष्ठाता डॉ.विजय पाटील, उपअधिष्ठाता डॉ.आरती कर्णिक, डेंटल कॉलेजचे डिन डॉ.अरूण दोडामनी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, डॉ. तुळशीराम गावित आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ना.अब्दुल सत्तार यांनी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या कामाचे कौतुक करतानांच माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. श्री शिवाजी विद्या प्रसारक मंडळ तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून ते धुळे जिल्हयातील जनतेला सेवा देत असल्याने त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. 

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कुणाल पाटील मागील दहा वर्षांपासून सभागृहात विविध प्रशनांवर आवाज उठवित असल्याचेही ते म्हणाले. पाण्यामुळे हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता वाहून गेला या रस्त्यासाठी तातडीने 38 लाख रूपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आल्याचे ते म्हणाले. पुढील दोन महिन्यात हा रस्ता तयार करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. कोविड सेंटरचा परिसर अल्हाददायक असून याठिकाणच्या वातावरणामुळे रूग्ण तातडीने बरा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. हॉस्पिटलचे संचालक, स्टाफ यांचेही त्यांनी आभार मानले. केवळ सात दिवसात रात्रंदिवस काम करून उभारलेल्या कोविड सेंटरचे काम पाहून पालकमंत्री भारावून गेले. 

जिल्हयातील सर्वात सुंदर कोविड सेंटर असल्याचे ते म्हणाले. या कोविड सेंटरसाठी सर्वप्रकारची मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधिक्षक, सीईओ, महापालिका आयुक्त यांनी एकत्रित येवून उत्तमप्रकारे नियोजन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जवाहर मेडिकल फाउंडेशनला लागणारी सर्व प्रकारची मदत शासनाकडून करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री तसेच अन्य मान्यवरांचा जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री रोहिदास पाटील, डॉ.भाईदास पाटील, आमदार कुणाल पाटील आदींनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमात प्रत्येकाला मास्क लावणे तसेच सोशल डिस्टसींग पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. हे कोविड सेंटर नरीमन पॉईंटवर असल्यासारखे वाटते

जवाहर मेडिकल फाउंडेशनचे कोविड सेंटर पाहत असतांना खिडकीकडे गेल्यानंतर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नकाने तलावचा परिसर पाहिल्यानंतर हे कोविड सेंटर मुंबईच्या नरीमन पाँईंटवर असल्यासारखे वाटते. 

हा नजारा प्रचंड सुंदर असल्याचे ते म्हणाले. पर्यावरणाशी समरूप असलेले हे कोविड सेंटर निश्चितच आदर्शवत ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध