Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

धोकादायक खंडेश्वरवाडी प्रकल्पातून सांडवा फोडून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त ! ! !





परंडा (राहुल शिंदे) दि.29  तालुक्यातील नळी नदीवर असलेला खंडेश्वरवाडी मध्यम प्रकल्प यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून  वाहत होता.या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता 10.800 द.ल.घ.मी आहे. 

परतीच्या पावसामुळे हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता.शेतकरी वर्ग अगदी आनंदी होता,चार वर्षाचा दुष्काळ संपुष्टात आला होता,परंतु हा आनंद क्षणार्धात नष्ट झाला.

काल परिसरातील नागरीक भरलेल्या तलावाची पाहणी करण्यासाठी गेले असता या प्रकल्पाच्या भरावास वरील बाजूला आडवी मोठी लांब भेग पडली असल्याचे निदर्शनास आले.

यामुळे शेतकऱ्यात व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.प्रशासनाने गांभीर्य ओळखून काल रात्रीच नदी काठच्या लोकांना अतिदक्षतेचा इशारा देऊन त्यांचे तात्पुरते स्थलांतर केले आहे.

 या प्रकल्पास धोका निर्माण झाल्याने, प्रकल्पावरील संभाव्य अनर्थ लक्षात घेऊन,  
जि.प उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या वतीने,सांडवा फोडून व कॅनॉलद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग नदी पत्रात करण्यात आला.

चार वर्षांनंतर तलाव भरल्यामुळे खंडेश्वरवाडी, जेकटेवाडी,ताकमोडवाडी,देवगाव येथील शेतकरी आनंदी होते,त्यांच्या आनंदावर विरजण पडले,समाधानकारक पाऊस पडून देखील पाण्याची तीव्रता जाणवणार आहे.
 
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे  आ.प्रा.तानाजीराव सावंत यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या व योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले, यासंदर्भात काही मदत लागली तर नक्कीच  सहकार्य करेल असा शब्द दिला.

यावेळी जि.प उपाध्यक्ष धनंजय सावंत, सतीष दैन,गौतम लटके, रमेश पवार,अँड.संतोष सूर्यवंशी, रामचंद्र घोगरे, 

तहसीलदार अनिलकुमार हेळकर,सहाय्यक पो.निरीक्षक पालवे, बी.डी.ओ, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, मंडलअधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल व पत्रकार बांधव उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध