Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

हरवत चाललेले खेळ अनं, हरवत चाललेले आयुष्य.....


     आजच्या तंत्रज्ञाच्या युगात मानव खूप वेगाने प्रगती करत आहे...आणि याच तंत्रज्ञानाच्या मदतीने मानव त्याच्या यशाची शिखरे पार करत चालला आहे  त्याचबरोबर त्याचे आयुष्यही धावपळीचे,धगधगीचे झाले,अशातच टेक्नॉलॉजी च्या वाढत्या वापरामुळे मानव  अवघड कामे घर बसल्या बसल्या करू लागला,सोशल मीडिया ने मानवाला प्रसिद्धी मिळाली,यंत्रांमुळे कामे साधी सोपी झाली,ज्या कामांसाठी दिवस दिवस जायचा ते काम अगदी सहज आणि सोपे झाले,आज फक्त मोबाईलचं एक बटन दाबलं तरी महत्वाचा संदेश अगदी शून्य मिनिटात पोहोचतो, अर्थात हे सगळं शक्य झालं ते मानवाच्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर, पण याच धावपळीच्या आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या आयुष्यात आपण काहीतरी हरवत चाललो आहोत याची जाणीव वारंवार माझ्या मनाला चटक लावून जाते,ते म्हणजे हरवत चाललेले खेळ अनं,हरवत चालले आयुष्य....
               
     आज हीच गोष्ट तुम्हाला तळमळीने सांगावीशी वाटते ते म्हणजे आपण गावचं गावपण आणि गावातले ते जुने खेळ विसरत चाललो आहोत, गावच्या मातीचा सुगंध एक मनाला वेगळाच आनंद देत होता,तो आता उरला नाही असं नाही का वाटत तुम्हाला?किती छान,प्रांजळ होत ते बालपण, ते गावाकडचे खेळ,रानावनात बागडणं, नदीच्या पाण्यात डुंबणं,लपून गुपचूप मोराचा नाच पाहणं,पण,पण हे सध्या कुठं तरी हरवलंय,असं हरवलंय की ते सापडतच नाही!तुम्ही कुठे पाहिलंय का हो? पाहिलं असेल तर नक्की सांगा हं. मला अस वाटतंय की ते पाहणारी आमची १९९६ वाली पिढी बहुतेक शेवटची असेल?कारण या मोबाईल, सोशल मीडियाने त्याला लोकांपासून खूप दूर नेलंय हो ,आणि ते आयुष्य पुन्हा मिळेल का नाही हे ही मला माहीत नाही? पन आज सहज आठवलं म्ह्णून तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या बालपणी गोट्या,सोंगट्या,सुरपारंब्या, लंगडी,खेळायचो झोका,पतंग,नदीत कागदाच्या होड्या सोडायचो, रानात वनात हिंडायचो,चिंचा-पेरू चोरून खाणे हा तर माझा छंदच होता,आम्ही आमच्या बालपणी शाळा बुडवून ओड्याच्या पाण्यात होड्या सोडायचो दिवसभर तिथंच मासे खेकडे पकडत फिरायचो,आम्ही मित्र नेहमी सोबत असायचो आणि गम्मत म्हणजे एकमेकांसोबतच मारामारी सुद्धा करायचो... खरं सांगू आजही ते दिवस आठवले की नकळत डोळ्यात पाणी येत,अस वाटत की काय आयुष्य होत राव आपलं,चड्डीला बटन न्हवत म्हणून करगुट्याने चड्डी घट्ट बांधायचो,आई डोक्याला पार तोंडावर ओघळ येऊस्तर खोबरेल तेल लावायची आणि वरतुन कुणाची नजर लागू नये म्हणून काळजाचा टिक्का पण लावायची,अहो आम्हाला कुठली लागतीये कुणाची नजर आमचीच दुसऱ्याला नजर लागण्याची दाट शक्यता असायची,पण प्रत्येक आईची माया आणि प्रेम आपल्या मुलावर असतंच. गावाकडे गरिबी होती पण मनाची श्रीमंती खूप होती, खायला पोटभर मिळत नव्हतं पण पोट रिकाम कधीच नसायचं, खरंच मिळेल का अस आयुष्य आत्ताच्या पोरांना?आणि ते खेळ जे आम्ही खेळायचो?ते तर आता कधीच शक्य नाही, राजा राणी,चल्लस,चिपा, विटी दांडू,कागदाचं विमान,भोवरा फिरवणं ह्या गोष्टी आमच्या आयुष्याचा एक भागच बनल्या होत्या,आताच्या पोरांना माहीत असतील की नाही कुणास ठाऊक ! खरच मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की मी हे आयुष्य जगलो,पण काळ बदलत गेला तश्या मुलांच्या आवडीनिवडी बदलत गेल्या,पण काळ एवढा बदलेल असं कधीच वाटलं नव्हतं.. कालांतराने सोशल मीडियाच राज्य आलं आणि आमचं बालपण कुठेतरी हरवून गेलं,जी मुलं दिवसभर उन्हात शाळेच्या मैदानावर लगोरी खेळत होती तीच मुलं तासंतास मोबाईल वर पब्जी खेळू लागली,मैदानापेक्षा मोबाईल वरचा खेळ त्यांना आवडायला लागला आणि मुलं मोबाईल साठी वेडी झाली.त्या मोबाईलचं आणि इंटरनेट चं मुलांना इतकं वेड लागलं की मुलांना आजूबाजूला काय चाललं आहे त्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष राहील नाही,कार्टून, गेम यासारख्या खोट्या जगात मुलं बंदिस्त झाली.याचा परिणाम असा झाला की मुलामुलांमधला संवाद थांबला,मैत्रीचं नात दूर झालं,मुलं एकटी एकटी राहू लागली, त्यांच्यात एकलकोंढे पना आला,आणि मुलांच्या आरोग्यावर,मानसिकतेवर परिणाम झाला, मुलं अशक्त झाली,डोळ्यांची दृष्टी कमी झाली, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली,आणि मुलं गाव अणि गावच्या खेळांपासून कायमची दूर होत चालले आहे.

     एक आमचा काळ होता तेंव्हा आमचे आई बाबा आम्ही दिवसभर खेळायचो म्हणून आम्हाला मारायचे आणि आताचे आई बाबा खेळत नाही म्हणून मुलांना मारतात.ही कसली वेळ आली आहे आपल्यावर?हे पाहून खरंच मनाला खूप वाईट वाटतं हो,आणि त्यातच सध्या चालू असलेल्या कोरोना सारख्या महामारीमुळे मुलांना घरातच बसून राहायची वेळ आली,हे म्हणजे दुष्काळात तेरावा आल्यासारखच झालं म्हणायचं, कोरोना मुळे मुलांच्या शाळा बंद झाल्या मुलं घराच्या बाहेर पडायची बंद झाली आणि याला पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा मार्ग निघाला आणि उरल्या सुरल्या घरातही मोबाईल ने आक्रमण केले परिणाम असा झाला की शिक्षण राहीलं बाजूलाच पण मुलांना मोबाईल चं व्यसनच जडून गेलं आणि मुलांनी मोबाईल वर ताबा मिळवला पण नकळत मोबाईलनेही मुलांवर विजय मिळवलाच की.गावाकडे ही ऑनलाईन शिक्षणामुळे शेतकऱ्याला ही पोटाला चिमटा काढून मोबाईल घ्यावा लागला,आणि मग उरला सुरला ग्रामीण भागही या मोबाईल ने आपल्या ताब्यात करून घेतला,आता तर गावातली मुलही युट्युब,कार्टून, गेम्स ला बळी पडली, शहरातल्या मुलांचं अनुकरण करू लागली आणि गावचे खेळ विसरत चालली,मुलांचं आयुष्य एका छोट्याश्या मोबाईल फोन मध्ये बंदीस्त झालं,आणि गावचं आयुष्य हरवून गेलं.
                   
     असो, काळासोबत माणसाने पाऊले टाकली पण आपली संस्कृती,आपलं गाव,आपले पारंपरिक खेळ कसं विसरून चालेल,किमान ह्या खेळांचं आणि आपल्या संस्कृतीचं संगोपन करणं तरी आपल्या हातात आहे असं मला वाटतं,आपण जर सगळ्यांनी मिळुन निश्चय केला तर हे नक्कीच शक्य आहे...फक्त आपण आपल्या मुलांना या मोबाईलच्या जगातून बाहेर काढणं गरजेचं आहे,आणि जर हे शक्य झालं तर नक्कीच आपले जुने दिवस आपल्या मुलांना जगायला मिळतील आणि एका सुंदर आयुष्याची पुन्हा सुरुवात होईल.

लेखन:- युवराज देवकर (युवा स्पोर्ट्स)
संकलन:- राहूल शिंदे, विभागीय संपादक (9975114800)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध