Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

डेव्हलपर्सच्या भागीदारांवर कारवाई करावी अशी मागणी..!



शिंदखेडा (प्रतिनिधी) शिंदखेडा येथील श्री साईबाबा लँड डेव्हलपर्सच्या भागीदारांचा 1215 या गावठाण जागेशी काहीही संबंध नसताना जागा खाली करण्याच्या संदर्भात श्री साईबाबा डेव्हलपर्सच्या भागीदारांनी या परिसरातील नागरिकांना धमकी दिल्याच्या तक्रार अर्ज पोलीस निरीक्षकांना देण्यात आला आहे.

शिंदखेडा येथील देवस्थान इनाम वर्ग 3 ची व पिरस्थानची जमीन मिळकत गट नंबर 1192/1 व 1192/2 ही जमीन बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे. या गटक्रमांकाला लागून असलेल्या 1215 या गावठाण जागेत राहत असलेल्या नागरिकांना जागा खाली करण्याच्या संदर्भात धमकी दिल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे. श्री साई बाबाला डेव्हलपर्स भागीदार दिपक देसले, किरण शहा, संजय शहा, सौ प्रेरणा देसले, यांच्याविरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या तक्रार अर्जावर परिसरातील पंचवीसच्या वर नागरिकांच्या सह्या आहेत.पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शिंदखेडा नगरपंचायती हद्दीतील विरदेल रोड परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिरासमोर गावठाण क्रमांक 1215 च्या सरकारी जमिनीवर सुमारे चाळीस ते पन्नास वर्षापासून नागरिक स्थायिक झाले आहेत. या ठिकाणी ते नागरिक राहत असून नागरिकांना नगरपंचायतीने मिळकत नंबर दिला आहे.

नागरिक गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून वीज व पाणी सुविधादेखील घेत आहेत. तसेच नगरपंचायतीच्या कराचा नियमित भरणा करीत आहेत. श्री साई बाबा डेव्हलपर्सचे भागीदार यांचा 1215 गट नंबरशी कोणताही संबंध नसताना लँड डेव्हलपर्स भागीदारांनी या परिसरातील नागरिकांना जागा खाली करण्यासंदर्भात धमकी दिली आहे. 

सध्या कोविड-19 चे वातावरण असल्यामुळे डेव्हलपर्स कडून येणाऱ्या धमक्‍या मुळे हे नागरिक धास्तावले आहेत. श्री साईबाबा लँड डेव्हलपर्स भागीदारांनी या परिसरातील नागरिकांना धमकी व मानसिक त्रास दिल्यामुळे डेव्हलपर्सच्या भागीदारांवर कारवाई करावी अशी मागणी या तक्रार अर्जात करण्यात आली आहे. 

या अर्जावर मका मराठे, रामदास मराठे, शिवदास मराठे, भरत बोरसे, शामकांत मिस्तरी, अनिल चौधरी, मोहन जाधव, कमरुद्दीन पिंजारी, देविदास पाटील, देविदास चौधरी, मोहम्मद मणियार, कैलास मराठे, सीताराम चौधरी,पंडित बडगुजर यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत सदर तक्रार अर्ज जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी तहसीलदार व मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदखेडा नगरपंचायत यांना देखील पाठविण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध