Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना सिल्लोड नजीक २२ वर्षीय युवतीचा मृत्यू ; जामनेर येथील साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची संतप्त नातेवाईकांकडून तोडफोड..!



जामनेर प्रतिनिधी.जामनेर येथील २२ वर्षीय तरुणीला औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना सिल्लोड नजीक तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि.८ रोजी घडली असून तिचा मृत्यू डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटल्सची तोडफोड केली असून डॉक्टरांच्या अटकेसाठी काही वेळ रस्ता रोको करण्यात आला.                                                              
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शहरातील प्रकाश नगर येथील रहिवासी दिपाली अर्जुन चौधरी वय २२ हिला मानेचा त्रास असल्यामुळे शहरातील पाचोरा रोड वरील साई मल्टीस्पेशलिटी या खाजगी हॉस्पिटल्समध्ये दि.५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते त्याच दिवशी दुपारच्या सुमारास तिच्या मानेवरच्या गाठीचे ऑपरेशन करण्यात आले होते.त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी शहरातील ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.  

रविवार दि.८ रोजी तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला सकाळी नऊ वाजता औरंगाबाद येथे नेत असतानाच रस्त्यातील सिल्लोड जवळ दिपालीचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी  मृतदेह डॉक्टरांना जाब विचारण्यासाठी परत जामनेर येथील साई हॉस्पिटल मध्ये आणून ठेवला.मात्र हॉस्पिटल्सचे संचालक डॉ.राजेश नाईक हे सकाळपासूनच आपल्या हॉस्पिटलमध्ये नसल्याचे कळताच नातेवाइकांचा संताप अनावर झाला. 

त्यांनी डॉक्टरांची संपर्क साधला असता होऊ न शकल्याने त्यांनी हॉस्पिटलच्या सामानासह खिडक्यांची नासधूस केली यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.यातून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. तिचे वडील तालुक्यातील पहूर येथील मूळ रहिवाशी असून काही वर्षांपासून जामनेर येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहे.

मयत दिपाली ही शहरातील सुरेशदादा जैन फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती.तिच्या पश्चात आई - वडील व एक भाऊ असा परिवार असून याबाबत पोलीस स्टेशनमध्ये अद्याप पर्यंत कोणतीही तक्रार दाखल नाही.  शहरातील पाचोरा रोडवरील साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये या अगोदर ही अनेक वेळा असे अनुचित प्रकार घडलेले असून प्रत्येक वेळी संतप्त नातेवाईकांकडून या हॉस्पिटल्सची नासधूस करण्यात येत असते‌.याच हॉस्पिटलमध्ये असे प्रकार का घडतात यांची आरोग्य विभागाने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.                                                       
मृतदेह डॉक्टरांच्या कॅबिनेटमध्ये ठेवला असून जो पर्यंत डॉक्टर समोर येत नाही व त्यांना अटक होत नाही तो पर्यंत हॉस्पिटलमधून मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा  नातेवाईकांनी घेतल्यामुळे मृतदेह रात्री उशिरापर्यंत हॉस्पिटलमध्येच पडून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध