Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

नर्सेस म्हणजे आरोग्य सेवेचा कणा...!



आरोग्य सेवा म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्या समोर येणारी पात्र नर्स (परिचारिका) डॉक्टर,फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन आरोग्य सेवक आणि कर्मचारी पणं आरोग्य सेवा देतांना पूर्णतः व पूर्णवेळ सेवा देण्याची परिपूर्ण जबाबदारी परिचारिका अर्थात नर्स च्या खांद्यावर असते हे कटू सत्य आहे. 

नर्सेस म्हणजे नात्याने एक  बहिण किंवा भाऊ नव्हे तर आपले समजून रुग्णांची योग्य काळजी घेणारी आत्मा होय, रूग्ण प्रेमाने सिस्टर ब्रदर असा शब्दोच्चार करतात
पण याची दखल घ्यायला लोकांकडे वेळ नाहीय. कारण जे संयमाने माणुसकीने कार्य करतात नेहमी त्यांचाच वाटेला माणुसकीचा पुरस्कारांपासून वंचित राहण्याची वेळ येते. त्यामुळे जनतेला परिचारिका नर्स यांच्या विषयी सन्मान जनक मानसिकता निर्माण व्हावी व नर्सेस ची खरी ओळख प्रकाशमान व्हावी या उद्देशाने नर्सेस म्हणजे रुग्णालयातील आरोग्य सेवेचा कणा या विषयावर  प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आहे.
         
रुग्णांशी सहजतेने विचारपुस करून पेशंट हिस्टरी काढून त्यावर प्रचंड वैचारिक शक्तीचा पाठपुरावा करून,संवाद करून समजून उमजून,नातेवाईकांशी प्रामाणिक पणें रुग्णांविषयी चर्चा काढणे,नर्सिंग समुपदेशांनाच्या बळावर रूग्णांना वाईट सवयी पासून दूर ठेवणे आणि त्यापासून  पुढील आयुष्याची वाटचाल करणे रूग्णांना सोपे जाते आणि परिवार सुखाने चालतो. नर्सिंग च्या विविध शैली मुळे रुग्णालयात परिचारिकेची अत्यंत गरज असते , रुग्णाच्या सहवासात नर्स सर्वात जास्त वेळ असते कारण दवाखान्यात आपली जवळून काळजी घेणारी ती व्यक्ती.आरोग्य सेवा कोण तीही आणि कुठेही असो त्यात नर्स हे पात्र अनिवार्य असतेच. म्हणतात ना की  डॉक्टर हे आरोग्य सेवेचा मेंदू असतो आणि नर्स हे आरोग्य सेवेचे हृदय असते.
     
रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्या आजारी व्यक्तीची शुश्रुषा करण्याची कसरत परिचारिका करते, पुस्तकी भाषेत नर्स परिचारिका यांच्या विविध व्याख्या उमटल्या आहेत पणं खऱ्या जीवनात मात्र आरोग्य सेवेचा कणा असणाऱ्या नर्सेस चा आरोग्य सेवेचा मानवी स्पर्श जेव्हा होतो तेव्हा खरी व्याख्या कळते.रुग्णांमध्ये  सकारात्मक ऊर्जेचा दृढ प्रसार होतो,आरोग्य शिक्षण देताना रुग्णांना मानसिक आधार देणे, औषधोचार करतांना योग्य जीवन शैलीचा प्रसंग आपल्या संवादशैलीने परखडपणे मांडणे जेणेकरून रूग्ण आजारातून लवकरात लवकर बरा होऊन सुखरूप घरी परतायला हवा हे आद्य कर्तव्य समजतात. अशा अनेक सत्य प्रसंगातून तत्व पूर्ण आणि कर्तव्य निष्ट नर्स परिचारिकेची व्याख्या उदयास येते. आणि लोकांसमोर प्रकाशित होते फक्त समजण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे.
     
आपल्या ज्ञानाचा,आरोग्य शैलीचा शिक्षणाचा आणि विचारांचा प्रभावी उपयोग रुग्णांची शुश्रुषा करतांना वापरतात , अश्या पध्दतीने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आजारी रुग्णांचा जीव सुध्दा वाचवण्याची कसब व धाडस या आरोग्य सेवेच्या नर्स मध्ये दडलेले असते. कारण नर्स आरोग्य सेवेशी समर्पित असतात. व्यक्ती रोगी असो किंवा निरोगी त्याची परिचर्या करण्याचे अद्वितीय कार्य नर्स ,परिचारिकेचे समजा.परिचारीका नर्स चे आरोग्य सेवे बरोबर  काही विशिष्ट कार्यही असतात
     
१) तालुका जिल्हा पातळीवर आरोग्याचे व्यवस्थापन करणे.
२) येणाऱ्या काळाची आरोग्य सेवेची चर्चेतून बांधणी आखणी करणे.
३) वेगवेगळ्या आरोग्य विभागाशी संवाद संपर्क साधणे.
४) लोकांच्या रुग्णांच्या आरोग्य बाबत व्यक्तिमत्व विकास साध्य करणे.
५) आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेणे, समिती गठीत करणे.
६) ग्रामीण भागात नियोजन पूर्ण बैठक घेणे.
७)नव्या आजारांचे संशोधन करणे, नव्या उपाय योजना आखणे
८) परिचर्या शिक्षण देणे ,प्रात्यक्षिक करून घेणे. इत्यादी आणि काही ठळक जबाबदाऱ्या असतात.
     
नर्सेसचा सेवेतून रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे,मानसिक त्रासातून मुक्त करणे,
मनस्थिती समजून रोगाचे निदान आपल्या कौशल्याने नियोजन बद्ध आणि तत्काळ करणे म्हणजे नर्सेस चा आंतरिक अलंकार होय. शांततेचा पांढरा पोशाख घालून सदैव रूग्ण सेवेत तत्पर राहणारी रुग्णांचा जिव वाचावा म्हणून धडपडणारी आणि अनेक संकट काळी,पसरणारे साथीच्या आजारां वेळेस सेवाधर्म निभावताना आपल्या परिवाराचा सुध्दा त्याग करणारी ती खरच मोठी विठू माउली असते. जन्म घेणाऱ्या बाळापासून ते मृत्युच्या दारा पर्यंत रुग्णालयात रुग्णांशी सर्वात जास्त जवळची आणि परिचयाची व्यक्ती ती नर्स परिचारीका असते.
      
सर्वत्र हाहाकार माजलेला असताना सुद्धा सध्याच्या महाभयंकर कोरोना काळातही मानसिक तंदुरुतीने आणि शारीरिक शक्तीने प्रकटलेली नवदुर्गा सर्वांना परिचित असणारी रुग्णांची शुश्रुषा करणारी नर्स परिचारीका होती हे विसरायला नव्हें.. कारण कोरोना काळातील क्षण सदैव अविस्मरणीय राहतील यात शंका नाही. आपले नातेवाईक सुध्दा जिथे हार मानतात आपल्या पासून दूर राहतात,तिथे नर्स नव्या जीवाचा विजयी पताका फडकवण्याठीसाठी कार्यरत असते. तीच भाऊ बहीण माय बाप बनून त्या रुग्णांची काळजी घेते हे सर्वत्र ज्ञात आहे. 

अश्या अनेक गुणांनी समृद्ध शिक्षण घेऊन विद्यार्थी दशेत एक परिचारीका नर्स तयार होतें आणि पुढे देशातील आरोग्य सेवेत आपल सर्वस्व निछावर करते. मातृत्व दातृत्व कर्तृत्व यांची सांगड घालून कर्तव्य बजावणे, सेवा भाव संवेदनशीलता व प्रमाणीकतेचा कळस डोक्यावर ठेवून डोळ्यात आरोग्य सेवेचे मयाविर अंजन घालून दिवस रात्रीही स्वयंशिस्त लावून कणखरपणे उभी असते. कार्य तत्परता , समजण्याची भावना ,आणि समजून सांगण्याची वृत्ती आणि परिश्रमाची कसोटी तिच्यात दडलेल्या सद्गुणांची पावती आहे.
आधुनिकतेच्या युगात परिचारिकेची बदलत्या संकल्पनेने आरोग्य सेवा देताना परिचारिकेचे अनेक प्रकार पडतात..ते खालील प्रमाणे
     
(१) नोंदणीकृत नर्स( २) परवाना प्राप्त व्यावहारिक नर्स( ३) व्यवस्थापक नर्स
(४) होम केअर नर्स (५) ऑपरेटिंग कक्ष नर्स
(६) आणीबाणी कक्ष नर्सज्ञ(७)नर्स अधिकारी
इत्यादी अनेक प्रकारची नर्स परिचारिका आपल्याला दिसायला मिळते मात्र सर्वांचे ध्येय आणि उद्दिश्टे मात्र एकच की आपल्या आरोग्य सेवेने रूग्णांना बरे करणे  , शुश्रुषा करणे आपल्या जीवाची पर्वा न करत रूग्ण सेवेत सामावून जाणे तेही निःस्वार्थ पणे. हे फक्त आरोग्य सेवेत नर्सेस च करू शकतात.
     
उपकेंद्र असो वा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर पालिका असो वा महनगरपालिका किंवा उपजिल्हा रुग्णालय असो वा जिल्हा रुग्णालय सर्वा मध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी नर्सेस परिचारिकेची गरज लागते त्यामुळे नर्सेस आरोग्य सेवेचा अविभाज्य अंग आहे यात शंका नाहीच. बौद्धिक चातुर्याने परिचारिका रुग्णांचा व नातेवाइकांचा प्रोत्साहित विश्वास आणि मार्गदर्शनाने रोग मुक्त करण्यासाठी  सदैव प्रयत्नशील असतात.
     
आपल्या  खेड्यापाड्यात आरोग्य सेवेचा लाभ समाज आणि कुटुंबांना व्हावा म्हणून घरोघरी भेटी देऊन आरोग्य शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याचं बीजारोपण देखील सार्वजनिक आरोग्य नर्स करत असते. म्हणून नर्स हा आरोग्य सेवेचा असा स्तंभ आहे की त्या विना रुग्णालयातील आरोग्य सेवेचा उंच उभा आणि दनगट किल्ला उभा राहूच शकत नाही. त्यामुळे
     
परिचारीका अर्थात नर्सेस म्हणजे आरोग्य सेवेचा कणा आहे हे सिद्ध होते. आणि शक्य ही....

शब्दांकन.दिपक सुमन पंडीत साटोटे
कोव्हिड स्टाफ नर्स जिल्हा रुग्णालय, नंदुरबार


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध