Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

ग्रामपंचायतींना पोलिस संरक्षण व ग्रामसभांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची मागणी. अन्यथा बहिष्कार.




नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मुरलीधर भगरे यांना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.

भारतीय संविधानातील कलम २४३ नुसार ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या कामकाजादरम्यान आवश्यकतेनुसार पोलीस बळाचे संरक्षण शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच ग्रामसभा नियमानुसार आयोजित करून तिचे कामकाज सुरळीतपणे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी शासनाची असावी, अशी प्रमुख मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी ग्रामसभा आणि इतर प्रचार-प्रसिद्धीच्या सभा या दोन्ही स्वतंत्र बाबी असल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. वर्षभरात विविध विषयांवर आयोजित होणाऱ्या सभा व ग्रामसभांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून ग्रामसभेचे पावित्र्य, तिची मूलभूत कार्यपद्धती आणि कायदेशीर प्रक्रिया अबाधित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच ग्रामसभांच्या मूलभूत कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करून त्यांना अधिक स्पष्ट व कायदेशीर मान्यता देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव/शिफारस पत्र सादर करण्याबाबत खासदार भगरे यांनी सकारात्मकता दर्शविली. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरणात शासकीय कामकाज करता यावे, यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही यावेळी चर्चेतून अधोरेखित झाले.

ग्रामसभा ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकशाहीचे महत्त्वाचे व्यासपीठ असून, तिचे कामकाज कायदा व नियमांच्या चौकटीत शांततापूर्ण आणि सुरळीतपणे पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशासकीय व सुरक्षा पाठबळ मिळावे, अशी संघटनेची भूमिका असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रसंगी निफाड तालुका अध्यक्ष नानासाहेब तांबे, सचिव गणेश शिंदे,ज्येष्ठ सदस्य अभिजित तुपे,दिनेश मोरे, कमलेश सावंत, जिल्हा मार्गदर्शक संजय बाविस्कर, जिल्हा कोषाध्यक्ष विनोद अहिरे,जिल्हा अध्यक्ष रवी ठाकरे तसेच जिल्हा सचिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह ग्रामसभांच्या कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार भास्कर भगरे यांनी दिल्याने संघटनेच्या मागण्यांना बळ मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध