Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

अंत्यसंस्कार केलेली राख चोरणारी टोळी, गजाआड


परंडा (राहूल शिंदे )दि.24 तालुक्यातील देवगाव (खुर्द) येथे एक महिला प्रसूतीनंतर मृत्यू पावली होती, महिलेवर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले होते, राहिलेली राख चोरणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.

 ग्रामस्थांनीच या टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील दोघांना पकडून ग्रामस्थांनी परंडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला असून, त्यातील 2 जणांचा अटक केली असून, 2 जण फरार आहेत.
गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर दुर्दैवाने प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या पार्थिवावर 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र,काल स्मशानभूमीत काही लोक अंत्यसंस्कार करत असलेल्या महिलेची राख भरत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या दिशेनं धाव घेतली.
गावकऱ्यांनी आरोपींना पकडलं गावकरी येत असल्याची माहिती मिळताच राख भरणारे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण दोन जणांचा ग्रामस्थांनी राखेच्या पिशवीसह रंगेहात पकडलं. यावेळी ग्रामस्थांनी आरोपींना चांगलाच चोप दिला. काही गावकऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांना कळवला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीसही घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं.
सदर आरोपी माढा तालुक्यातील बारलोणीचे आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक महिला तर एक पुरुष आहे. पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार जादूटोणा करण्यासाठी केला जात असल्याची चर्चा देवगाव खुर्दमध्ये व परिसरात सुरु आहे.

मात्र, आरोपी मृत महिलेची राख का घेऊन जात होते, हे पोलिसांकडून अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही.

या प्रकरणात परंडा पोलीस ठाण्यात कलम 297, 379, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली आहे. परंडा पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध