Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिवसेनेतील खांदेपालट कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य मात्र धुळे,नंदुरबार ची ही रणनीती यशस्वी ठरेल का?
शिवसेनेतील खांदेपालट कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य मात्र धुळे,नंदुरबार ची ही रणनीती यशस्वी ठरेल का?
आगामी विधानसभेच्या निवडणूकींवर लक्ष्य केंद्रीत करत शिवसेनेच्या धुळे व नंदुरबार जिल्हयाच्या कार्यकारणीत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत.शिवसेनेचे मुखपत्र सामना मधुन या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या असून शिवसेनेतील या खांदेपालटाने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेत आहे.कट्टर हिन्दुत्ववादी समजल्या जाणार्या शिवसेनेने भाजपाशी आपली पचंविस वर्षाची मैत्री तोडत पूर्णत ः वैचारिक मतभेद असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉगे्रस पक्षांसोबत युती करुन राज्याचे मुख्यमंत्री पदाची सूत्रे आपल्याकडे घेतली आहेत.अर्थात भाजपा शिवसेनेसारख्या मित्र पक्षाला गृहीत धरुन त्यांना तुच्छ वागणूक देत असल्याने भाजपाची जिरवण्यासाठीच शिवसेनेने विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांची शेकहॅड केला आहे. हे राज्यातील जनतेला विदीत आहेच.येणार्या काळात या तिन्ही पक्षांची आघाडी कायम राहिल असे सूतोवाच होत असले तरी भारतातील एकाही पंचागात या तिन्ही पक्षांची आघाडी येणार्या विधानसभा निवडणुकीत कायम राहिल असा ‘ग्रहयोग’ दिसून येत नाही. कारण काँग्रेसचे पटोले यांचे ‘नानाग्रह’ आणि राऊतांची ‘संजयदृष्टी’ केव्हा ‘महाभारत’सुरु करुन देतील याचा भरोसा नाही. शिवाय राष्ट्रवादीला ‘इडी’ चा दोष लागल्याने त्यांना 12 वा गुरु सुरु असून त्यांचेवर शनिची ‘वक्रदृष्टी’ पडली आहे. त्यामुळे येणार्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा ‘मंगल योग’ जुळुन येईल असे चित्र आजतरी दिसत नाही. त्यामुळे भविष्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस याच्यांतच पत्रिका जुळेल यात शंका नाही. आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी खेळी खेळली तर भाजपा राष्ट्रवादीचाही योग जुळुन येवू शकतो. असो. भविष्यातील समिकरणे काहीही असली तरी शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरुन हिलाल माळी यांची उचलबागंडी ही सामान्य घटना नाही. त्यांचे सोबत 2019 च्या विधानसभा निवडणूकीतही अशाच प्रकारचा घटनाक्रम झाला होता. गेली पाच वर्षे त्यांनी धुळे तालुक्यात प्रंचड मेहनत घेतली होती.परंतू त्यांना ऐनवेळी धुळे शहरातुन उमेदवारी देण्यात आली. आता झालेल्या संघनात्मक बदलात सुध्दा त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवून शिंदखेडा आणि शिरपूर विधानसभा मतदार संघाचे सहसंपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर जिल्हा प्रमुख पदावर आमदारांचे पती म्हणून ज्यांची ओळख आहे त्या डॉ. तुळशीराम गावीतांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही घटनांवरुन शिवसेनेच्या अंतर्गत गोटात मोठया प्रमाणावर आश्चर्य आणि आनंद व्यक्त, करण्यात येत आहे. कारण शिंदखेडा मतदार संघात अतिशय चांगल्या पध्दतीने जनसंपर्क वाढवत हेमंत साळुंखे यांनी शिवसेनेची एक भक्कम फळी निर्माण केली आहे. त्यामुळे हिलाल माळी यांना त्या ठिकाणी काम करण्यास खूप वाव आहे असे चित्र नाही. तर शिरपूर मतदार संघात आमदार अमरिशभाई पटेल यांचे साम्राज्य असल्याने शिरपूर तालुक्यात अमरिश भाईच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांचा कारभार अंतर्गत पातळीवर सांभाळतात अशी जनतेतुन चर्चा होते. त्यामुळे शिरपूर शहरात शिवसेनेचा झेंडा गाडला जाईल अशी स्थिती नाही. उलट खा. संजय राऊत विमानाने शिरपूर येथे आले तर त्यांना अमरिश भाई पटेल यांच्या धावपट्टीवर उतरावे लागेल. आणि त्यांचे स्वागत देखील दस्तुर खुद भाईच करतील, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे शिंदखेडा आणि शिरपूर ऐवजी धुळे ग्रामीणची जबाबदारी पून्हा हिलाल माळी यांचेवर सोपविण्यात आली असती तर जे समजण्यासारखे होते. राहिला. प्रश्न तुळशीराम गावित यांचा तर ते जिल्हाप्रमुख पदाला किती न्याय देवू शकतात यावर चर्चा सुरु झाली आहे. डॉ. तुळशीराम गावित हे मुळातच समुहात राहणारी व्यक्ती नाही. ते अत्यंत मवाळ, मितभाषी आहेत. त्यांंची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना किमान पाच वर्ष लागतील अशी परिस्थिती आहे. डॉ. तुळशीराम गावित म्हणजे आ. मजुंळाताई गावितांचे पती अशी त्यांची ओळख आहे. राहिला प्रश्न सतिष महाले यांचा तर सतिष महाले यांच्या महानगरप्रमुख नियुक्तीने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. सतिष महाले हे एकेकाळी ना. छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक होते. शिवसेनेत देखील त्यांनी चांगले काम केलेले आहे. काम करण्याची एक शिवसेना स्टाईल त्यांचे जवळ आहे. जातीय समिकरणे गृहीत धरली तरी त्यांना मानणारा एक मोठा मित्र परिवावर या शहरात आहे. शहराचे विधानसभेचे भावी उमेदवार म्हणून कदाचित त्यांचा विचार होवू शकतो, अशा प्रकारची मोठी यंत्रणा ते राबवू शकतात. राजवर्धन कदमबांडे यांचे नेतृत्वाखाली काम करतांना त्यांनी धुळे मनपात आपल्या कुटूंबातील सहा नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे शिवसेनेच्या एका गटात सतिष महाले यांच्या पुर्नआगमनाने आनंद साजरा व्यक्त केला जात आहे. मनोज मोरे यांची कार्यपध्दती सुध्दा एक चांगला ‘आंदोलक’ म्हणून सांगता येईल. धुळे मनपातील भ्रष्टाचाराला त्यांनी दिलेले आव्हान अभ्यासपूर्ण होते. मराठा क्रांती मोर्चाचे ते पदाधिकारी असून आरक्षण प्रश्नावर त्यांनी केलेले काम कौतुकास्पद असेच आहे. त्यांची महानगर (पूर्व) प्रमुखपदावर निवड करण्यात आली आहे. महेश मिस्तरी यांची धुळे शहर, ग्रामीण, तसेच साक्री, विधानसभा मतदार संघाचे सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्थात पक्ष संघटनेत बदल हे अपेक्षित असतात. परंतू हे बदल अनेकवेळा चर्चेचे कारण ठरतात. हिलाल माळी यांनी गेल्या पाच - सात वर्षात शिवसेना वाढीसाठी घेतलेली मेहनत नाकारता येणार नाही. त्यांचेवर शिंदखेडा आणि शिरपूरची जबाबदारी सोपविल्याने आ. अमरिशभाई पटेल आणि आ. जयकुमार रावल यांचे विरोधात त्यांना संघटन उभे करण्याची भूमिका पार पाडावी लागेल. दोन महारथींशी - सामना करतांना हिलाल माळी यांना किती यश मिळते ते येणार्या काळात बघणे औचित्याचे ठरेल. परंतु बाळासाहेबांचे वाघ समोर कोण आहे याला न घाबरता लढत असतात. शिवसेनेच्या या संघटनात्मक बदलाने जिल्हयात शिवसेनेचे किती आमदार निवडून येतात हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. शिवसेनेतील संघटनात्मक बदलाने कुठे आनंद तर कुठे आश्चर्य व्यक्त होते आहे. एव्हढेच.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा