Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

शिरपूर शहरासाठी ९० कोटी रुपयांची घरकुल योजना अंतर्गत ५५० घरकुले मंजूर



शिरपूर : शिरपूर शहरासाठी ९० कोटी रुपयांची घरकुल योजना मंजूर झाली असून तब्बल ५५० जणांना या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शिरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे मनापासून आभार मानले आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घटक क्र.- ३ ए. एच. पी. प्रकल्प “केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समिती”च्या बैठकीत दि. २५/०३/२०२१ रोजी मंजूर करण्यात आला.

सदर प्रकल्प अंतर्गत लाभार्थींचे सर्वेक्षण करून अर्ज प्राप्त करणे,पात्र लाभार्थींची यादी प्रसिद्ध करणे इ. कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहेत.सदर कामी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून योजनेच्या या कामांना त्वरित मंजुरी प्राप्त झाली आहे.

सदर प्रकल्प हा शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या मालकीचे मुकेशभाई रिक्रिएशन गार्डनच्या मागे, भूखंड स.नं. ६०  या जागांवर प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक साठी ४०० घरकुले व मध्यम उत्पन्न गट घटका साठी १५० घरे असा एकूण ५५० घरकुलांचा यात समावेश आहे. सदर प्रकल्पाची एकूण किंमत (रस्ते, गटार, पाणी पुरवठा इ. सह) रुपये ९०.०२ कोटी एवढी आहे. प्रधानमंत्री आवस योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व मध्यम उत्पन्न गट घटकसाठी पात्र लाभार्थींना प्रत्येकी २.५० लाख मात्र अनुदान मिळणार आहे. सदर प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरु करणेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक व प्रशासकीय मान्यता म्हाडा कार्यालया कडून नुकतीच प्राप्त झालेली असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे.

माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल,शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,सर्व नगरसेवक,नगरसेविका, मुख्याधिकारी आबा महाजन,नगर अभियंता माधवराव पाटील,प्रशासकीय अधिकारी संजय हसवाणी,अमरावती येथील आर्किटेक अमित अग्रवाल, सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून शहरातील पात्र लाभार्थींना स्वतःचे घरकुल मिळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध