Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

युवकांनो मातृभूमीच तुमचा स्वर्ग-प्रा.मारोती बुद्रुक.



अहमदपूर (प्रतिनिधी) गजानन आनंतवाळ
ज्या आई-वडिलांनी आणि जन्मभूमी ने तुमच्यावर संस्कार केलेत त्या मातृभूमीला आणि मातृत्वाला विसरू नका तेच तुमच्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत असे व्याख्याते व प्रख्यात निवेदक प्रा.मारोती बुद्रुक  पाटील यांनी आवाहन केले.
     
वाघोली येथील गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत गावाकडे वळून पाहताना या विषयावर प्रा.मारोती बुद्रुक पाटील बोलत होते.विचारपीठावर माजी मुख्याध्यापक अप्पाराव केंद्रे ,त्रिंबक केंद्रे, गंगाधर सोनवणे माजी प्राचार्य,विश्वाभंर केंद्रे माजी सैनिक, मानाजी सोनवणे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा मारोती बुद्रुक पाटील  म्हणाले की महात्मा गांधी म्हणाले होते की खरा भारत हा खेड्यात आहे खेडी सुधारली तर देश सुधारेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या भारतात बंधुभाव नित्य वसु दे दे वरचि असा दे असा संदेश देत कलियुगातही राम राज्य याव आणि सर्वांना सुख समाधान मिळावं हा त्यांचा मूळ उद्देश होता.तुझं गावच नाही का तीर्थ तू कशाला फिरतो व्यर्थ असे सांगीतले.
         
आपल्या महाराष्ट्राला संत सांप्रदायाची परंपरा असून इथल्या प्रत्येक संताला समाजसुधारकाला खेड्यापाड्यातला माणूस सुधारावा म्हणून ते भजन प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन करायचे परंतु आजची तरुण पिढी शिकली-सवरलेली गाव सोडून शहराकडे वळली माणूस गाव सोडून शहराकडे गेला की तो परत गावाकडे वळूनही पाहत नाही.

गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून कार्य केले तर गाव सुधारायला वेळ लागणार नाही.आपलेही गाव हिवरे बाजार राळेगण-सिद्धी होऊ शकते.गावातील माणसांचे रक्त संबंधाचे नाते जपायला हवेत.आपण कितीही मोठे झालो किती श्रीमंत झालो तरी जन्मदात्या आईला आणि जन्मभूमी ला कधी विसरू नका तिचे आपल्यावर अनगिनत उपकार असून ती स्वर्गापेक्षा हि सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष वैजनाथ सोनवणे उपाध्यक्ष पांडुरंग केंद्रे सचिव अजय कल्याणी कोषाध्यक्ष परमेश्वर कुसनूरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत केंद्रे, महादेव सोनवणे ,गजानन सोनवणे, योगेश केंद्रे आदींनी परिश्रम केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध