Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

देवळा अॅग्रो’ला राष्ट्रीय संस्थेकडून मिळाली कांदा बीजोत्पादनाची परवानगी केदा (नाना) आहेर, अध्यक्ष, देवळा अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी




देवळा अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीला राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र (डीवोजीआर), राजगुरुनगर या संशोधन संस्थेच्या ‘भीमा शक्ती’ या कांदा वाणाच्या बीजोत्पादनासाठी नुकतीच मंजुरी मिळाली आहे. पुढील काळात बीजोत्पादनासाठी लागणारे मूलभूत बियाणे प्राप्त झाल्याची माहिती ‘देवळा अॅग्रो’ अध्यक्ष केदा(नाना) आहेर व संचालक प्रवीण मेधने यांनी दिली.
मागील वर्षी नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी अतिशय महागडे बियाणे विकत घेऊन देखील कांद्याची रोपे खराब झाली होती. यामुळे कांदा बागायतदारांना आर्थिक फटका बसून देखील कांदा रोपाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दर्जात्मक आणि गुणवत्तापूर्ण कांदा बियाणे मिळत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत देखील आले होते.
शेतकऱ्यांना ‘बीज ते बाजार’ सुविधा देणाऱ्या देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यासाठी सतत प्रयत्नशील होती. दर्जात्मक उच्च प्रतीचे कांदा बियाणे तयार करण्याच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय कांदा आणि लसूण संशोधन केंद्र यांच्याकडे ‘देवळा अॅग्रो’ने पायाभूत बियाण्यांची मागणी केली होती.
सध्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनी काम करत असल्याने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राष्ट्रीय कांदा - लसूण संशोधन केंद्र या संस्थेने देवळा अॅग्रोला आता पायाभूत बियाण्यांची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता 'देवळा ॲग्रो'चा बीजउत्पादनाचा मार्ग सुकर झाला आहे. यापूर्वी देखील कृषी संशोधन व विकास संस्थेकडून (एनएचआरडीएफ) कांद्याच्या बीजोत्पादनासाठी मंजुरी मिळाली होती त्या माध्यमातून ‘देवळा ॲग्रो’ने निर्मिती केलेल्या ‘मुलकन’ या ब्रँडला  शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद देखील दिला होता.
“ राष्ट्रीय पातळीवरील संशोधन संस्थाच्या माध्यमातून एका छताखाली ‘बीज ते बाजार’ सुविधा देणाऱ्या देवळा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमुळे आता शेतकऱ्यांना इतरत्र ठिकाणाहून महागडे आणि शाश्वती नसलेले कांदा बियाणे खरेदी करण्याची गरज भासणार नसून वेळेची व पैशांची अशी दुहेरी बचत होऊन दर्जात्मक बियाणे देखील उपलब्ध होणार देखील आहे.”

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध