Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा साक्री व धुळे तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध वाहतुकी विरोधात धडक कारवाई... शिरपूर प्रतिक्षेत..!
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा साक्री व धुळे तालुक्यात गौण खनिजाच्या अवैध वाहतुकी विरोधात धडक कारवाई... शिरपूर प्रतिक्षेत..!
साक्री प्रतिनिधी : धुळे उपविभागातील धुळे व साक्री तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे,अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.वाळूसह गौण खनिज माती,दगड,कंकर,खडक किंवा मुरुम याच्यातून राज्य शासनास महसूल प्राप्त होतो. गौण खनिजाच्या वाहतूक उत्नखनन व उपयोजन महसूल विभागाची परवानगी आवश्यक असते.तरी देखील विना परवाना अवैध वाहतूक,उत्खनन,साठे,उपयोजन केले जाते.त्यामुळे शासकीय महसुलाची हानी होते.या पार्श्वभूमीवर गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागातर्फे पथके गठित करण्यात आली आहेत.
सरपंच, ग्रामसेवकांना बजावली नोटीस
वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याहळोद व कुसुंबा येथील सरपंच व ग्रामसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात म्हटले आहे, ग्रामसभेने वाळू लिलाव करण्यास लेखी हरकत कळविल्यास वाळू गटाचे लिलाव करण्यात येणार नाहीत. मात्र, अशा वाळू गटाचे उत्खनन होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीची राहील.
या वाळू गटातून उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उत्खननास ग्रामपंचायतीने प्रतिबंध करून त्याची माहिती तहसीलदार,जिल्हाधिकारी यांना देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीवर राहील व अवैध उत्खनाबाबत संबंधितांविरोधात होणाऱ्या कारवाईस मदत करणे अनिवार्य आहे. तसेच वाळू, रेती निर्गती धोरणानुसार ग्राम दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, पांझरा नदी पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन, वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी कुसुंबा शिवारात पाहणी केली असता 25 ब्रास वाळूचा साठा आढळून आला.
कुसुंबा शिवारात 23 नोव्हेंबर 2021 रोजी 100 ब्रास वाळूचा साठा आढळून आला. तसेच मागील महिन्यात कुसुंबा शिवारात गौण खनिज पथकांनी वाळूची अवैध वाहतूक करणारी नऊ वाहने पकडली. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या हद्दीतून, नदी पात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्यास अशा ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 145 (1) नुसार ग्रामपंचायत विसर्जनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, तर संबंधित पोलिस पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
बंधपत्रांचे उल्लंघन, लाखोंचा दंड नकाणे,
ता.जि.धुळे येथील पंकज श्रावण महाले यांचे वाहन क्रमांक (मिनी डंपर) एमएच 28, एबी 7634 हे 3 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी कुसुंबा येथील पांझरा नदी पात्रालगत सरकारी गट क्रमांक 761 क्षेत्र 2 हेक्टर 19 आर येथे असलेल्या वाळूच्या दोन ढिगांच्या मध्ये उभे होते.यावरून वाळूच्या अनधिकृत वाहतुकीबाबत दंडाच्या स्वरुपात एक लाख रुपये दंड तहसीलदार, धुळे यांनी ठोठावला होता. तो कायम ठेवण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी दिला आहे.
तसेच गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहने यापूर्वी महसूल विभागाने पकडली होती. त्यावरून संबंधितांनी शंभर रुपयांच्या बंधपत्र लिहून दिले होते. या बंधपत्रात म्हटले आहे, की संबंधित वाहनाचा वापर भविष्यात अनधिकृतपणे गौण खनिज काढणे, हलविणे, गोळा करणे, दुसऱ्या जागी उचलून नेण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी व त्यांची वाहतूक करण्यासाठी करणार नाही. यापैकी कोणतीही कृती पुन्हा आढळून आल्यास संबंधित वाहनाच्या बाजार मूल्यापेक्षा कमी नसेल एवढी रक्कम दंड (शास्ती) म्हणून सरकारला देण्यास तयार राहील,असे नमूद केले आहे. या बंधपत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी गणेश हिरामण पाटील,हिरामण दशरथ पाटील रा.बोरीस, ता.जि.धुळे यांना साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
सदरचा दंड न भरल्यास संबंधितांच्या मालकीचे क्षेत्र बोरीस येथील गट क्रमांक 708/2अ/3 क्षेत्र एक हेक्टर 26 आर मालमत्तेवर बोजा चढविण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. याशिवाय बंधपत्राचे उल्लंघन केल्याने समाधान परमेश्वर पाटील, रा. कुंडाणे (वरखेडी, वाहन क्रमांक एमएच 41, डी 1439), ता. जि. धुळे यांना साडेचार लाख रुपये, बलराज लालचंद पाटील (अहिरे) रा. कुंडाणे (वार, वाहन क्रमांक एमएच 18, एए 7585), ता. जि. धुळे यांना सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शेतात वाळू सापडली, ठोठावला दंड
धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. त्यात वाल्मिक महानोर, उत्तम महानोर, मिलिंद मुडावदकर यांच्या मालकीच्या जापी, ता. जि. धुळे शिवारातील गट क्रमांक 240/2 मध्ये वाळूचा ढिग आढळून आला. त्याचा पंचनामा जापीच्या तलाठ्यांनी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार संबंधितांचा खुलासा मागविण्यात आला होता.
वाल्मिक महानोर यांचा खुलासा त्यांचा मुलगा भूषण याच्या मालकीचे वाहन मिनी ट्रक क्रमांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी वाळू या गौण खनिजाची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला, तर उत्तम महानोर व मिलिंद मुडावदकर यांनी खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे तहसीलदार श्रीमती सैंदाणे यांनी या तिघांना आठ ब्रास वाळूच्या संदर्भात एकूण दोन लाख 4 हजार रुपये दंड ठोठावला आहे. अशाच प्रकारचा दंड कुसुंबा शिवारातील गट क्रमांक 697/अ या पंडित झिपा परदेशी व मधुकर झिपा परदेशी यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर आढळून आलेल्या चार ब्रास वाळू साठा आढळल्याप्रकरणी करण्यात आला आहे.
त्यांना एकूण एक लाख दोन हजार रुपये दंड असेही आदेश दिले आहेत. कुसुंबा व न्याहळोद येथील नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांना नोटिसद्वारे अवगत केले आहे, की त्यांच्या जमिनीचा वापर हा गौण खनिजाची अवैध वाहतूक, उत्खननासाठी साहाय्य केल्यास दंड तसेच जमीन सरकार जमा होतील, असे अवगत करण्यात आले आहे.एकाला केले हद्दपार वाळूसह
गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीविरुध्द तत्कालिन तहसीलदार श्री. कदम यांनी ट्रॅक्टर चालकास पकडले होते.त्यावेळी शासकीय वाहनासमोर दुचाकी वाहन लावून शासकीय वाहनास अडथळा निर्माण करून संशयित आरोपीस ट्रॅक्टर पळवून नेण्याचा इशारा करून तसेच फिर्यादीस ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दीपक छगन खताळ,रा.लोढा नाला,ता.जि.धुळे याच्याविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.यासह अन्य गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
त्याला धुळे व नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर,चाळीसगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी दिले आहेत.
याशिवाय मागील आठवड्यात कुंडाणे (वार) शिवारात पांझरा नदी पात्रालगत वीटभट्टीसाठी आवश्यक परंतु विनापरवाना मातीचा साठा उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला आढळून आला होता. तेथून एक मिनी ट्रक, एक मिनी डंपर, एक जेसीबी, एक पोकलॅन मशीन ताब्यात घेत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
धुळे उपविभागात गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाची पथके गठित करण्यात आली आहेत. आवश्यक तेथे पोलिस दलाची मदत घेवून गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण राबविण्यात येईल.
-तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा