Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मे, २०२२

जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य...! आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक



धुळे,प्रतिनिधी दि. 20: राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे.या अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे,असे सरकारी कामगार अधिकारी अ.ज.रुईकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

राज्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेत असण्याकरीता शासनाने अधिसूचना प्रसिध्द केलेली आहे.यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापनांना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम,2017 च्या कलम 36 क-1 कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाने व आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम 7 लागू आहे त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असणार आहे.

तसेच अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात.मराठी भाषेतील अक्षरलेखन,नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते,अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्यांची नावे लिहिणार नाही याची आस्थापना मालकांनी नोंद घ्यावी.या अधिसूचनेची जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी काटेकोरपणे अंमबजावणी करावी,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री.रुईकर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध