Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

शिरपुर- चोपडा रोडवर तरडी येथे रस्ता रोको आदोंलन!!!



भाकप,किसान सभा ,लालबावटा शेतमजूर युनियनच्या आंदोलनाची मंत्री गिरीष महाजनांनी घेतली दखल आंदोलन यशस्वी झाल्याचा भाकपाचा दावा


शिरपूर / प्रतिनिधी शिरपूर चोपडा रस्त्यावरिल तरडी गावाजवळ मोठा खड्डा पडला असून त्या जागेवर कायम स्वरुपी दुरुस्ती व्हावी व इतर मागण्यांसाठी आज दि.३ अॉक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलक भाकपा,किसान सभा, लालबावटा शेतमजूर युनियन यांनी आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.  

शिरपूर चोपडा रस्त्यावर तरडी गावाजवळ वळणावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले असून या वर्षी चार / पाच जणांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत.या खड्ड्याची फक्त दुरुस्ती न करता या ठिकाणी पुल बांधावा. रस्ता उंच करावा व भविष्यातले अपघात टाळावेत.तसेच बँक अॉफ महाराष्ट्र या राष्ट्रियकृत बँकेतून शेतकर्‍यांना सुलभपद्धतीने पिक कर्ज मिळावे. विज वितरण कंपनीने विजपुरवठा नियमित करावा.अशा विविध मागण्यांसाठी भाकपा,किसान सभा,लालबावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व अॅड. हिरालाल परदेशी, अॅड. संतोष पाटील, कॉ. अर्जून कोळी, कॉ।कमलाकर कोळी, कॉ. किशोर सुर्यवंशी, कॉ. वसंत पाटील, कॉ. साहेबराव पाटील यांनी केले. 
 

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या आंदोलनासाठी बभळाज,तरडी, हिसाळे,तोंदे,आंबे,खंबाळे, चाकडू अशा अनेक गावातून आंदोलक पक्षाचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर अॅड. परदेशी,अॅड. पाटील, डॉ किशोर सुर्यवंशी, कॉ.वसंत पाटील आदींनी आंदोलकांसमोर भाषणे केली. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

याचवेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरिश महाजन हे शिरपूर येथील सत्कार समारंभास जात असल्याने ते व जि.प.अध्यक्ष डॉ.तुषार रंधे आंदोलनस्थळी थांबले. आंदोलन कर्त्यांच्या मागण्या जाणुन घेत घटनास्थळावरूनच मंडळ अधिक्षक अभियंता नवले यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन तात्काळ नविन पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या शासकीय पुर्तता कराव्यात.आधीही इथे माझा स्वताचा अपघात होता होता वाचला असल्याचे सांगत आता पर्यंत का लक्ष दीले नाही अशी विचारणा करीत मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री असुन उडवाउडवीची उत्तरे देऊ नका असे सांगत त्यांनी वरीष्ठांना धारेवर धरले. संबंधीत सचिव व मंत्रीशी वैयक्तिक बोलुन एक महीन्यात टेंडर काढुन मार्चच्या आत काम करण्याचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले. पालकमंत्री ना. महाजन यांनी आंदोलकांकडून मागण्यांचे निवेदन स्विकारले व मीच आता जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने रस्त्याचे काम मार्चपूर्वी पूर्ण होईल असे सांगून पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. 
       
यानंतर आंदोलकांच्या वतीने सा.बां. विभाग,विज वितरण कंपनी,बँक अॉफ महाराष्ट्र,तहसिलदारांच्या वतीने सपोनि उमेश बोरसे यांना मागण्यांचे निवेदन दिले.

कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर यांचे रात्री दिर्घ आजाराने निधन झाले.त्यांना आंदोलन सुरु होण्यापूर्वी सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कॉ. अर्जून कोळी यांनी शिराळकर यांच्या शहादा तालुक्यात श्रमिक संघटनेच्या माध्यमाने केलेल्या कार्याला उजाळा दिला. 

आंदोलन शांततेत पार पडावे व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी थाळनेर पोलिस स्टेशनचे सहा. पो. निरिक्षक उमेश बोरसे व कर्मचारी होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलन संपल्यानंतर १०मिनीटात वाहतूक सुरळित करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध