Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट , रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाची सूचना मी केली होती ; पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गुवाहाटी दौरा रद्द...!



उध्दव ठाकरे यांनी आधीच महाराष्ट्रभर दौरे केले असते तर आजची वेळ आली नसती.मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे अडीच वर्षांत केवळ चार वेळा मंत्रालयात गेले.तत्कालीन परिस्थितीत उध्दव ठाकरेंना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा हे सांगणारा मीच होतो,असा गौप्यस्फोट राज्याचे कृषीमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केला.

अब्दुल सत्तार हे आज नाशिक दौर्‍यावर होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.एकीकडे आज बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला कामाख्या देवी दर्शनाला रवाना झाले असतानाच कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र नाशिक दौर्‍यावर आले आहेत.

यासंदर्भात विचारणा केली असता सत्तार म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदार गेलेत म्हणजे महाराष्ट्र दर्शनासाठी गेले असा अर्थ होतो.मी गुवाहाटीला गेलो नाही,कारण माझा कार्यक्रम पूर्वनियोजित होता.त्यामुळे कोणत्याही नाराजीचा प्रश्‍न येत नाही. औरंगाबादमध्ये देखील कृषी प्रदर्शन होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधील कृषी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी आलो आहे.त्याशिवाय नागपूरला नितीन गडकरी यांनी भरविलेल्या प्रदर्शनालाही भेट देणार असल्याचे ते म्हणाले.सत्तार म्हणाले,
आज परिस्थिती बदलली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार लोकांचे आहे.त्यामुळे मुख्यमंत्री अनेक भागात भेटी देत आहेत तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हे आता रस्त्यावर उतरत आहेत.उद्धव ठाकरे यांनी आधीच असे दौरे केले असते तर ही वेळ आली नसती.महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त चार वेळात मंत्रालयात गेले.मी त्याचवेळी म्हणालो होतो की, उद्धव ठाकरे यांना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा.मात्र त्यासाठी शरद पवार,सोनिया गांधी यांची अनुमती आवश्यक होती.मी छोटा कार्यकर्ता असल्याने काही केले नाही,असेही ते म्हणाले.


मंत्रिमंडळ विस्तार लवकरच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिन्नर येथील दौर्‍यावर सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री ईशान्यश्वेर मंदिरात दर्शनासाठी आले होते,हात दाखविण्यासाठी नाही.तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत,यात कोण कोणाला हात दाखवेल ते कळेल,अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या मंत्री मंडळावर म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून त्या संदर्भातील यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसह आमदार गुवाहाटी दौर्‍यावर गेले आहेत, मात्र अनेकजण टीका करत आहेत.अजित पवार यांनी देखील गुवाहाटी दौर्‍यावर तोंडसुख घेतले आहे.अजित पवार यांनीही बारामतीचा एखादा रेडा घेऊन गुवाहाटीला जायला पाहिजे,अशी सणसणीत चपराक सत्तार यांनी लगावली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध