Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी हवेत स्पीड गन,सीसीटीव्ही कॅमेरे बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवणे अशक्य...!



नंदुरबार प्रतिनिधी :
नंदुरबारशहरातील दोन्ही उड्डाणपुलावरून हाेणाऱ्या रहदारीचे प्रमाण माेठे आहे. मात्र पूल अरुंद असल्याने या भागात वाहन चालवणे धोक्याचे ठरत आहे.त्यामुळे राेजच या उड्डाणपुलावर राेजच अपघात हाेत आहेत. बायपासवर असलेल्या उड्डाणपुलावरून वाळू वाहतूक करणारी अवजड वाहने धावतात.त्याचवेळी या उड्डाणपुलावरून कर्मचारी, व्यापारी व विद्यार्थी वर्गांची रहदारी मोठ्या प्रमाणावर सुरू असते.अलिकडे या दोन्ही उड्डाण पुलावर अति वेगाने वाहने चालवली जात असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.ते कमी करण्यासाठी या भागात स्पीड गन,सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत,अशी मागणी आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.

नंदुरबार शहर हे जिल्ह्याचे केंद्र स्थान आहे.शहरात संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक कामानिमित्त येत असतात.

त्या मुळे शहरात वाहनांच्या संख्येत भर पडल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होते.उड्डाणपुलाच्या पलीकडे सिंधी कॉलनी,गिरी विहार,जिजामाता महाविद्यालय,वृंदावन कॉलनी,सेंट मदर टेरेसा कॉलेज, सी.बी.लॉन्स,स्विमिंग पूल, विविध हॉस्पिटल असल्याने या भागात रोजच ये-जा असते. मात्र प्रत्येकाला घाई झालेली असते. शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारा एकमेव दुवा म्हणजे रस्ता हा शहरातील उड्डाणपूल आहे.काही तांत्रिक अथवा इतर कारणास्तव या उड्डाणपुलाची रुंदी कमी असल्याने वाहनांची वर्दळ नेहमी हाेताना दिसते.

या उड्डाणपुलावर कोणत्याही प्रकारचे नियमांचे पालन न करता भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. त्यात चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे,चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, वाहनांच्या गतीवर कोणतेही नियंत्रण नसणे अशा प्रकारे विविध नियमबाह्य पद्धतीने वाहने चालवली जातात.आणि त्यामुळे रोज त्या उड्डाणपुलावर अपघात होतात.त्यावर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसत नाही. वेळीच संबंधित विभागांनी या संदर्भात तातडीने उपाययाेजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

गर्दीवर नियंत्रणासाठी गतिराेधक, दुभाजकाची गरज
उड्डाणपुलाजवळ जैन मंदिर आहे. या भागात नेहमी धार्मिक उत्सव होतात. शाळेच्या रॅली निघतात, त्यामुळे वाहतूक ठप्प होते.तहसील कार्यालय याच भागात असल्याने आंदोलनकर्त्यांची गर्दी होते.छोटे-मोठे कामे करण्यासाठी जाणाऱ्यांची या उड्डाणपुलावरून गर्दी असते.गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतीराेधक (स्पीड ब्रेकर), रस्ता दुभाजक (डिव्हायडर) असणे गरजेचे आहे.सुदैवाने अपघातांत आतापर्यंत जीवितहानी टळली आहे. -रवींद्र पाटील,रहिवासी.

दुभाजकासह अन्य उपाययाेजना करणे अत्यंत आवश्यक उड्डाणपुलावर दुभाजक (डिव्हायडर), वेग माेजणारे मशीन (स्पीडगन मशीन) आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत.त्यामुळे बेशिस्त पद्धतीने वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवणे शक्य होईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध