Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार ,धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती



धुळे, दि. 10 : येत्या 21 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या 12 वी व त्यानंतरच्या दहावीच्या परिक्षेच्यावेळी जिल्ह्यात कॉपीमुक्त परिक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून याकरीता विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कॉपीमुक्त परिक्षा अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या नाहीत. तर शाळास्तरावर परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी परीक्षेत कॉपी करण्याचे व कॉपी पुरवण्याचे गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व विभागांकडून एकत्रीतपणे प्रयत्न केले जाणार आहेत. यास पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले.
हे अभियान राबविताना
परीक्षा केंद्राचे अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण अशी वर्गवारी करण्यात येणार असून काॅपीचे प्रकार होणा-या परिक्षा केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक परिक्षा केंद्रावर बैठे पथक तसेच भरारी पथकही नियुक्त केले जाणार आहेत. शिवाय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक हेही परिक्षा काळात विविध परिक्षा केंद्राना भेटी देणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांची झडतीही घेतली जाणार आहेत. गोपनीय परिक्षा साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहेत. ज्या परीक्षा केंद्रांवर 5 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी कॉपी करतांना सापडतील त्या परीक्षा केंद्राच्या केंद्रसंचालकांवर कारवाई करण्यात येणार आहेत, जिल्ह्यात गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला जाणार आहेत. या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ त्याठिकाणी पोलीस व इतर पथक पोहचणार आहेत. परीक्षा केंद्रावर 50 मीटरच्या आत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशास बंदी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 12 वीच्या परीक्षेसाठी 45 परीक्षा केंद्रावर 23 हजार 879 तर दहावीच्या परीक्षेसाठी 28 हजार 199 विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याचे शिक्षणाधिकारी श्री. देसले यांनी सांगितले.
परीक्षेसाठी अद्यापही दहा दिवसांचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. जेणेकरून त्यांना काॅपी करण्याची आवश्यकता भासणार नाही असे सांगून
जिल्हा प्रशासनाच्या या अभियानात विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध