Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

महसुल सप्ताहानिमित्त नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न;-जिल्हाधिकारी अभिनव गोयल महसुल सप्ताहाचा सांगता समारंभ संपन्न....!



धुळे प्रतिनिधी :- दिनांक 7 ऑगस्ट, 2023 महसुल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट,2023 या कालावधीत राबविण्यात आलेल्या महसुल सप्ताहानिमित्त नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे महसूल सप्ताह सांगता समारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्री.गोयल बोलत होते.या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार,आमदार मंजुळाताई गावित, महापौर प्रतिभाताई चौधरी,अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण,सहायक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अतुर्लीकर, तुकाराम हुलवळे,महेश जमदाडे यांच्यासह तहसिलदार,नायब तहसिलदार तसेच महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गोयल म्हणाले की, महसुल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक माहिती होऊन त्यांना विविध योजनेचा लाभ देता यावा तसेच नागरिकांमध्ये शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल विश्वास वृद्धिगत व्हावा, या दृष्टिकोनातून 1 ऑगस्ट पासून महसुल सप्ताह राबविण्यात आला.या सप्ताहात 1 ते 6 ऑगस्ट दरम्यान महसुल विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

महसुल सप्ताहानिमित्त मला धुळे जिल्ह्यातील साक्री,शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागास भेट देण्याची संधी मिळाली.या भेटीत लोकांच्या शासनाकडून अपेक्षांची व जबाबदारीचीही जाणीव झाली.बहुतेक भागात शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना माहिती नसल्याने त्यांना लाभ घेताना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले.येत्या काळात विविध योजनांची माहिती तसेच अधिक गतीने चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपले काम या सप्ताहापुरतेच मर्यादीत न राहता अधिक जलदगतीने नागरिकांची कामे यापुढेही होत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महसुल सप्ताहानिमित्ताने अधिकाधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केला. विविध योजनांचे लाभ जलद गतीने देण्यात आले. जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचारी, विविध संघटना, कर्मचारी बरोबर चर्चा करण्याची संधी मिळावी व त्यातून त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या. येत्या काळात महसुल विषयक प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न असणार असून वर्षभर महसुल सप्ताह चालू राहून ई- चावडी, ई-हक्क प्रणाली बाबतची माहिती ग्रामीणस्तरावर पोहोचण्याचा आम्ही प्रयन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच हा सप्ताह चांगल्याप्रकारे साजरा केल्यामुळे त्यांनी संपुर्ण महसुल कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले.

आमदार मंजुळाताई गावित म्हणाल्या की,महसुल विभागाने या सप्ताहाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देण्याचा प्रयत्न केला.यापुढेही नागरिकांना चांगल्या सेवा तसेच विविध योजनेचा लाभ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम हुलवळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी केले.तर महसुल सप्ताहा निमित्ताने झालेल्या विविध कार्यक्रमांची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा येथील लाभार्थ्यांना लाभाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध