Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

वाडी बु.ग्रामपंचायत कार्यालय नेहमी बंदच ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी...! वाडी बु येथील ग्रामसेवक सतत गैरहजर...!



बोराडी ता.शिरपूर प्रतिनिधी -  वाडी बु ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात येत नसल्याची तक्रार  ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामसेवक नियमित येत नसल्याने गावाचा विकास खुंटला असून,विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी अडचण निर्माण झाल्याचे चित्र आहे.वाडी बु येथील ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात येत नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी ग्रामपंचायत कार्यालयात विविध दाखले व उताऱ्यासाठी हेलपाटे मारत आहेत. सदर ग्रामसेवक कामावर येत नसल्याची तक्रार  गटविकास अधिकाऱ्यांकडे करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

वाडी बु ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाची रजिस्टर व कागदपत्रे घेऊन गेल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना आवश्यक असणारी दाखले मिळत नाही.कधी काळी तालुक्यातील शांत आणि संयमी गाव म्हणून वाडी बु गावाची ओळख होती. मात्र सद्याची परिस्थिती पाहता ती ओळख पुसली जाण्याची भीती वाटत आहे सध्या गावात भरकटत असलेल्या राजकारणामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासन अस्थिर झाल्यामुळे गावात गट तट निर्माण होऊ लागले आहेत. ही गोष्ट गावाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका नागरिकांना डोईजड झाल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाय या भरकटलेल्या राजकारणाचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो.  
ग्राम प्रशासनातील पदाधिकारी आणि सदस्य यांचेच काही गोष्टींमध्ये एकमत होत नसल्याने गावातील विकास कामे करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे.

पदाधिकाऱ्यांचा पंचायतीच्या सचिवावर कोणताच वचक राहिलेला नाही ,म्हणून ग्रामसेवक यांना वाटेल त्या दिवशी ग्रामपंचायतिचे कामकाज सुरु राहील त्यांना वाटेल तेव्हा बंद राहील यामुळे ग्रामस्थांचे अनेक कामे रखडत आहेत, त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे ,त्यामुळे वाडी बु ग्रामपंचायत प्रशासन गावाचा कारभार चालवण्यात कुठेतरी अपयशी ठरत आहे.

अँड ज्ञानेश्वर थोरात.
ग्रामस्थ वाडी बु.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध