Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २३ मे, २०२५

ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला बसमधून उतरवल्याप्रकरणी वाहक निलंबित



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर आगाराच्या शिरपूर-पुणे बसमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला अरेरावी करत बसमधून उतरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर-लोणी दरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत होता. या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) तात्काळ कारवाई करत संबंधित वाहक मेहेरवान तडवी याला निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर आगाराची बस नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात येत होते. त्यावेळी संगमनेर-लोणी परिसरातून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याशी वाहक मेहेरवान तडवी याने गैरवर्तन केले. "हे फुकट प्रवास करणारे आहेत, अधिकारी असते तर गोष्ट वेगळी असती," असे अपमानास्पद उद्गार काढत वाहकाने त्या वृद्ध आजी-आजोबांना बसमधून खाली उतरवले.या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला. वाहकाच्या उर्मटपणाबद्दल आणि ज्येष्ठ नागरिकांशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. समाजमाध्यमांवर वाहकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत MSRTC ने त्वरित कारवाई करत वाहक मेहेरवान तडवी याला निलंबित केले आहे. महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आणि समाजमाध्यमांवर काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे एसटी महामंडळाच्या प्रतिमेला धक्का लागत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महामंडळाने योग्य ती पाऊले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध