Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ जून, २०२५

नरडाणा पोलिसांच्या सतर्कतेने आणखी एक जीव वाचला;



बेटावद प्रतिनिधी:- नरडाणा पोलिसांची सतर्कता आणि तात्काळ कृतीमुळे आणखी एक व्यक्ती आत्महत्येपासून वाचली असून, त्यांच्या वेळीच दाखविलेल्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही घटना दिनांक 16 जून 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. धुळे येथील गिरीश सूर्यवंशी यांनी नरडाणा पोलीस स्टेशनवर फोन करून कळवले की, प्रदीप रुपचंद सूर्यवंशी (वय 50 वर्षे, राह. विष्णुनगर, मोची वाडा, धुळे) हे आपल्या मुलासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर घरी "मी तापी नदी पात्रात जाऊन आत्महत्या करणार आहे" असे सांगून बाहेर गेले आहेत.

ही माहिती मिळताच नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईट राउंडवर असलेल्या अंमलदारांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. पोलीस अंमलदार अजय सोनवणे, नारायण गवळी, राकेश शिरसाठ व सुरज सावळे यांनी शासकीय वाहनाने तात्काळ तापी नदी पात्र परिसरात धाव घेतली.

सदर ठिकाणी पोहोचून त्यांनी परिसरात बॅरिकेट्स लावले आणि येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची तपासणी सुरू केली. काही वेळातच आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेले प्रदीप सूर्यवंशी हे तापी नदी पात्राजवळ आढळून आले. त्यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन नरडाणा पोलीस स्टेशनला आणण्यात आले आणि नंतर त्यांच्या नातेवाईक – मुलगा आकाश कोळी आणि पत्नी नंदा सूर्यवंशी यांच्या सुपूर्द करण्यात आले.

विशेष म्हणजे, अशाच प्रकारची घटना दिनांक 11 जून रोजी रात्री घडली होती. त्या दिवशीही धुळे येथील अमीन पिंजारी नावाच्या व्यक्तीचा जीव नरडाणा पोलिसांनी सतर्कतेने वाचविला होता. त्यामुळे आठवडाभरात पोलिसांनी दोन जीव वाचवून आपली तत्परता आणि जबाबदारी सिद्ध केली आहे.

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेसह त्यांच्यातील माणुसकीची भावना देखील ठळकपणे समोर आली आहे. एका कुटुंबाचा आधार वाचवण्यात पोलिसांनी दिलेल्या योगदानाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध