Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ जानेवारी, २०२६

मुकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे शिक्षा*

अमळनेर प्रतिनीधी:- येथील ढेकू बुद्रुक गावातील एका १६ वर्षीय

मुकबधिर अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमास अमळनेर न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. दिपक नाना भिल (वय २७) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तदर्थ अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

नेमकी घटना काय? जानेवारी २०२२ मध्ये ही संतापजनक घटना उघडकीस आली होती. पीडित मुलगी मुकबधिर असून ती रात्रीच्या वेळी घराबाहेर खाटेवर झोपलेली असताना, आरोपी दिपक भिल याने तिला फूस लावून घराच्या मागे नेले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी शेतात व घरामागे पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. या त्रासामुळे पीडित मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती राहिली. ही बाब लक्षात येताच पीडितेच्या वडिलांनी ३० जानेवारी २०२२ रोजी अमळनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.

DNA चाचणी आणि तंत्रज्ञानाचा आधार.
या खटल्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता मूकबधिर असल्याने तिची साक्ष नोंदवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. न्यायालयाने विशेष शिक्षकांची दुभाषिक म्हणून नियुक्ती केली आणि बंद खोलीत व्हिडिओग्राफीद्वारे पीडितेची साक्ष नोंदवली. तपासादरम्यान पीडितेच्या पोटातील बाळाचा DNA अहवाल आणि आरोपीचा DNA जुळल्याने आरोपीचा गुन्हा सिद्ध होण्यास मोठी मदत झाली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील आणि डॉ. अनिता देशमुख यांची साक्षही याकामी महत्त्वाची ठरली.

शिक्षा आणि दंड.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दिपक भिल याला भा.द.वि. कलम ३७६ (२) (एन) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६ नुसार दोषी ठरवून खालील शिक्षा सुनावली.

२० वर्षे सश्रम कारावास. १० हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास). दंडाच्या रकमेपैकी ७ हजार रुपये पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश.

तपास पथकाचे कौतुक, या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ यांनी केला होता. खटल्याच्या कामकाजात पैरवी अधिकारी पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पीएसआय उदयसिंग साळुंके, पो.हे.कॉ. प्रमोद चोपडा, राहुल रणधीर, भरत ईशी आणि सतिष भोई यांनी मोलाचे सहकार्य केले. या निकालामुळे परिसरातून समाधान व्यक्त केले जात असून नराधम गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध