Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

तळोद्यात बंद घरात रिक्षाचालकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; प्रतापनगर परिसरात खळबळ



तळोदा प्रतिनिधी :- शहरातील शहादा रोडवरील प्रतापनगर भागात एका बंद घरात रिक्षाचालकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सचिन गोरख जाधव (वय ४३) असे मृत चालकाचे नाव असून, त्यांचा मृत्यू सुमारे तीन दिवसांपूर्वीच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सचिन जाधव हे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नातेवाईकांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे त्यांचे नातेवाईक अशोक सूर्यवंशी आणि विजय वाघ हे बुधवारी त्यांच्या राहत्या घरी चौकशीसाठी गेले. घराचा दरवाजा आतून बंद होता आणि परिसरातून दुर्गंधी येत असल्याने नातेवाईकांना संशय आला. त्यांनी तातडीने तळोदा पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, सचिन जाधव यांचा मृतदेह आढळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सचिन जाधव हे मूळचे सुरत येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंबीय आजही सुरतेतच वास्तव्यास आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी ते उदरनिर्वाहासाठी तळोद्यात आले होते. सुरुवातीला बदली चालक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा रिक्षा व्यवसाय सुरू केला होता. प्रतापनगर येथे ते एकटेच राहत होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अधिक तपास करत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध