Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

धुळ्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मनपा पथकाला धक्काबुक्की; कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्ण



धुळे प्रतिनिधी : धुळे शहरातील वडजाई रोड परिसरातील हाजी नगर भागात अनधिकृत अतिक्रमणे काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकाला स्थानिक काही व्यक्तींनी जोरदार विरोध करत धक्काबुक्की केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोंधळात अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांना लक्ष्य करण्यात आले, तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने ही मोहीम पुन्हा यशस्वीपणे राबवण्यात आली.

वडजाई रोडवरील भोईवाडा आणि हाजी नगर परिसरात सकाळपासूनच महापालिकेने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली होती. कारवाई सुरू असताना काही टवाळखोरांनी पथकाला दमदाटी करण्यास सुरुवात केली आणि थेट शासकीय बुलडोझरच्या वायर काढून काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पथक प्रमुख प्रसाद जाधव यांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले आणि धुडगूस घालणाऱ्या संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांच्या कडक पहऱ्यात महापालिकेने आपली मोहीम पूर्ववत सुरू ठेवली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल संबंधित व्यक्तींविरोधात कठोर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध