Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

खंडणीसाठी मामा-भाच्याचे फिल्मी स्टाईल अपहरण; जळगाव पोलिसांच्या धाडसी कारवाईने ३ तासांत सुटका



जळगाव प्रतिनिधी : राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्यांचे अपहरण करत २० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा जळगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासांत पर्दाफाश केला आहे. शनिपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला येथे धाडसी कारवाई करत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून तरुणाची सुखरूप सुटका केली.
पार्सलच्या बहाण्याने बोलावले
गोलाणी मार्केटमधील मोबाईल साहित्य विक्रेते कृष्णकुमार चौधरी आणि त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन केला. राजस्थानहून तुमचे पार्सल आले आहे, असे सांगून त्यांना ममुराबाद रस्त्यावरील एका इमारतीत बोलावले. तेथे पोहोचताच आरोपींनी चाकूचा धाक दाखवत गणपतलाल यांना बांधून ठेवले आणि दोघांचेही अपहरण केले.

आरोपींनी मामा-भाच्याला दुचाकीवरून भुसावळमार्गे अकोल्यात नेले. तेथे एका ठिकाणी डांबून ठेवत भाच्याला सोडवण्यासाठी कृष्णकुमार चौधरी यांच्याकडे २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, चौधरी यांनी प्रसंगावधान राखत जळगाव गाठले आणि तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व हकीगत सांगितली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अपहरणकर्त्यांचे लोकेशन मिळवले. पोलीस पथक पहाटेच अकोल्यात दाखल झाले आणि सापळा रचून मुख्य आरोपी यश माकोडे याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी गणपतलाल माळी यांची सुटका केली.

पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस व एलसीबीने केलेल्या या समन्वयपूर्ण कामगिरीचे जळगावात कौतुक होत आहे. या प्रकरणातील अन्य दुव्यांचा शोध पोलीस घेत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध