Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ मार्च, २०२६

ज्ञानसमृद्धी अभ्यासमाला सामान्यज्ञान स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद,खा.भगरे




बापू चव्हाण दिंडोरी

शिक्षक संघाचे दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन वडजे यांनी शिवजयंती निमित्त सुरू केलेला ज्ञान समृद्धी अभ्यासमाला सामान्यज्ञान स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद असून बालवयातील सामान्य ज्ञान स्पर्धां विविध पदांच्या शासकीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पोषक असल्याचे प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी केले.
        
दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे व उपक्रमशील शिक्षक नौशाद आब्बास यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून दिंडोरी तालुक्यातील इयत्ता ४ थी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ७५ प्रश्‍न व १५० गुणांची ज्ञान समृध्दी अभ्यासमाला सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट अंतीम चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी खा.भास्कर भगरे बोलत होते.अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीणनाना जाधव होते.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रवीण नाना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते,तर ते दूरदृष्टीचे राज्यकर्ते, न्यायप्रिय शासक आणि लोककल्याणकारी नेतृत्वाचे आदर्श होते.त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना ज्ञान, शिस्त, संघटन आणि ध्येयवादी वृत्ती यांना सर्वोच्च स्थान दिले.त्यांच्या कार्यातून आपल्याला कळते की,केवळ शौर्य नव्हे तर सुज्ञता आणि योग्य निर्णयक्षमता याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
‘ज्ञानसमृद्धी अभ्यासमाला’ या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामान्यज्ञानाची आवड निर्माण झाली आहे.स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठी नसते,तर स्वतःला घडवण्यासाठी असते.आज बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो; तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे कौतुक करतो. कारण प्रयत्न करणारा प्रत्येक विद्यार्थी हा खरा विजेता असतो.
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात ज्ञान हीच खरी शक्ती आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात माहिती सहज उपलब्ध आहे मात्र त्या माहितीचे योग्य ज्ञानात रूपांतर करण्याची क्षमता आपण विकसित केली पाहिजे.अभ्यास,वाचन आणि जिज्ञासा या माध्यमातूनच व्यक्तिमत्त्व सर्वांगीण घडते.
          
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण,अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव,माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत खांदवे, दिंडोरी जनता इंग्लिश स्कुलचे प्राचार्य शरद शेजवळ,माजी सैनिक गणपत जाधव, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष बापू (तात्या) चव्हाण,भगवान गायकवाड संतोष कथार,संदीप गुंजाळ,गोरख जाधव,श्रीमती साधना पेलमहाले, सोमनाथ दिघे,अनिल दिघे,माधवराव निगळ,छबु मटाले रघुनाथ मोरे,जीवन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.खा.भास्कर भगरे पुढे म्हणाले की,शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी चालू घडामोडी आपल्या इयत्तेत दिलेल्या अभ्यासक्रम तसेच तालुक्यापासून देशापर्यंतचा विविध घटकांचा व विषयांचा अभ्यास सामान्य ज्ञान स्पर्धेच्या निमित्ताने केल्याने त्यांचे पुढील शैक्षणिक जीवनात या अभ्यासाचा उपयोग होवून महाराष्ट्र लोकसेवा आयोजन, केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच विविध भरती प्रक्रियेत घेतल्या जाणार्‍या परीक्षेसाठी या उपक्रमाचा फायदा होईल असे ते म्हणाले. 
      
यावेळी शिष्यवृत्ती व स्पर्धां परीक्षांची तयारी याविषयावर साधना पेलमहाले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता ४ थी ७ वी च्या सहभागी विद्यार्थ्यांमधील प्रत्येक तीन क्रमांक निवडण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.इयत्ता ४थी - प्रथम क्रमांक :- तन्वी वाघमारे (जि.प. शाळा बोरवण), गुण १४६ व्दितीय क्रमांक - दत्तात्रय कथार (जि.प.शाळा तळेगाव दि.), गुण १३६ तृतीय क्रमांक - यज्ञेश बोंबले (जि.प.शाळा अवनखेड), गुण १३६ इयत्ता ५ वी -प्रथम - गौरी गावित (जि. प. शाळा भातोडे), गुण १३८ व्दितीय- दिया रेहरे (जि.प.शाळा जऊळके दिंडोरी), गुण १३६ तृतीय - आवणी सुरसे (जनता विद्यालय दिंडोरी), गुण १३६ इयत्ता ६ वी.- प्रथम - रेहान मन्सुरी (जनता हायस्कूल, वणी), गुण १३८ व्दितीय - मानसी गवळी (जि.प.शाळा जऊळके दिंडोरी), गुण १३२ तृतीय - कुणाल पाटील (जि.प.शाळा जऊळके दिंडोेरी), गुण १२४ इयत्ता ७ वी - प्रथम - श्रुतिका ठोंबरे (जि.प.शाळा अक्राळे), गुण ११६ व्दितीय - गुंजन जाधव (जनता विद्यालय, दिंडोरी), गुण १०६ तृतीय - साही नाठे (जनता विद्यालय, दिंडोरी), गुण ९८ यांनी यश संपादन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्रास्ताविक दिंडोरी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन वडजे यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षक मित्र मासिकचे कार्यकारी संपादक सुनील पेलमहाले यांनी केले. आभार नौशाद आब्बास यांनी मानले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याण कुडर्के,सागर जगताप,भुषण बोरस्ते, गोंविंद गिरी,ऋषीकेश खांदवे,विशाल पहुर, विकास 
जाधव, आदींनी विशेष परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध