Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ मार्च, २०२६

व्हॉईस ऑफ मीडिया’,‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’चा ध्यान उपक्रमला प्रतिसाद




बापू चव्हाण दिंडोरी 
      
गेल्या सात दिवसांपासून व्हॉईस ऑफ मीडिया आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ध्यानवर्ग आता दिवसेंदिवस अधिकच बहरत आहे. राज्यभरातील पत्रकारांनी या उपक्रमाला दिलेला प्रतिसाद उल्लेखनीय ठरत असून,मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याकडे माध्यम क्षेत्रात वाढत चाललेली जाणीव यामुळे अधोरेखित होत आहे.आज सातव्या दिवशीही तीन हजारांचा सहभागाचा टप्पा पत्रकारांनी पार केला. सातत्यपूर्ण उपस्थिती आणि वाढता प्रतिसाद यामुळे हा उपक्रम केवळ कार्यक्रम न राहता एक सकारात्मक चळवळ बनत असल्याचे चित्र दिसून आले.ध्यानसत्रांमधून पत्रकारांना मानसिक स्थैर्य, सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा अनुभव मिळत आहे. 
           
या विशेष सत्राला आध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलिल पुळेकर,ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख,उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा शेटे आणि ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे नेतृत्व करणारे विजय चोरडिया यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ध्यान,सुदर्शन क्रिया आणि मानसिक स्वास्थ्याच्या महत्त्वावर सखोल प्रकाश पडला. एकूणच,पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेला हा उपक्रम आता व्यापक सामाजिक संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ ठरत आहे. योगध्यान उपक्रमाच्या निमित्ताने ‘द आर्ट ऑफ लिव्हिंगचे’ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलिल पुळेकर यांनी ‘सुदर्शन क्रिया’विषयी सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी सांगितले की, सुदर्शन क्रिया ही केवळ श्वसन तंत्र नाही,तर शरीर,मन आणि भावना यांच्यातील संतुलन साधणारी एक प्रभावी साधना आहे.नियमितपणे सुदर्शन क्रिया केल्याने तणाव कमी होतो, मन शांत होते, नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. 
          
यावेळी आध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी ध्यानाचे व्यापक महत्त्व स्पष्ट केले.त्यांनी सांगितले की, ध्यान ही केवळ वैयक्तिक शांततेची प्रक्रिया नसून सामाजिक परिवर्तनाची शक्ती आहे. व्यक्तीचे मन शांत आणि संतुलित असेल,तर त्याचे विचार आणि कृती सकारात्मक होतात.अशा संतुलित व्यक्तींच्या समूहातूनच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गुरुदेवांनी अधोरेखित केले की, आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनशैलीत ध्यान ही अत्यावश्यक गरज आहे.ध्यानामुळे मनातील अस्थिरता कमी होते, सहनशीलता वाढते आणि संवाद अधिक समजूतदार होतो. 
           
आजच्या सातव्या दिवसाचे उद्घाटक असणारे जेष्ठ पत्रकार तथा रविकिरण देशमुख समूह राजकीय संपादक,नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल म्हणाले की,‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम केवळ योगध्यान कार्यक्रम नाही, तर पत्रकारितेच्या क्षेत्रात एक सकारात्मक चळवळ आहे.आज माध्यम क्षेत्रातील स्पर्धा,वेग आणि दबाव लक्षात घेतला तर पत्रकारांसाठी मानसिक स्थैर्य ही अत्यावश्यक गरज बनली आहे.हजारो पत्रकारांचा सहभाग हा केवळ आकडा नाही,तर पत्रकार समाजात आरोग्याबाबत निर्माण होत असलेल्या जागरूकतेचा पुरावा आहे.अशा उपक्रमांमुळे पत्रकार अधिक संतुलित,वस्तुनिष्ठ आणि संवेदनशील दृष्टिकोनातून काम करू शकतात.समाजाला दिशा देणाऱ्यांनी स्वतः सक्षम आणि निरोगी असणे ही काळाची गरज आहे.” “पत्रकारांचे आयुष्य बाहेरून ग्लॅमरस वाटते;परंतु वास्तवात ते सतत तणाव, अनिश्चितता आणि भावनिक दडपणाने भरलेले असते.अपघात, गुन्हे,राजकीय संघर्ष,सामाजिक अन्याय अशा नकारात्मक घटनांशी दररोज सामना करताना मनावर मोठा ताण साचतो. 
तर याच ध्यान साधना कार्यक्रमाचा समारोप करताना शिल्पा शेटे उद्योजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणाल्या की,‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि काळाची गरज ओळखणारा आहे.पत्रकारांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला होता.सतत तणावाखाली काम करणाऱ्या पत्रकारांसाठी ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणे ही मोठी सामाजिक सेवा आहे.त्याच पद्धतीने आता ग्रामीण भागात,विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी ध्यान,समुपदेशन आणि मानसिक बळ देणारे शिबिरे आयोजित करावीत.‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’सारख्या जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थेकडे तज्ज्ञ मार्गदर्शक,
प्रशिक्षक आणि व्यापक जाळे आहे.त्यांनी पुढाकार घेतल्यास हजारो कुटुंबांना नवजीवनाची आशा मिळू शकते. आज पत्रकारांसाठी सुरू झालेली ही सकारात्मक चळवळ उद्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी,अशी माझी मनापासून अपेक्षा आहे.चला,आपण सर्वांनी मिळून ‘तणावमुक्त महाराष्ट्र’ घडविण्यासाठी पुढाकार घेऊया.” 
          
यावेळी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं.राज्यभरातून सहभागी झालेल्या पत्रकारांनी संयोजकाचे आभार मानले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध