Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

विशेष पोलीस महानिरीक्षक( आय जि )स्कॉड’चे बनावट पोलीस बनून २५ लाखांची खंडणीची मागणी ; झटापटीत पिंपळगावच्या व्यक्तिचा मृत्यू.





जब्बार चांद तांबोळी


संदीप अवधूत -

आयजी स्कॉडचे पोलीस असल्याचे सांगत गुटख्याने भरलेली पिकअप अडवून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत पिंपळगाव (ता. देवळा) येथील व्यापारी जब्बार चांद तांबोळी (वय ५५) यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत चांदवड तालुक्यातील वरचे गाव येथील पिकअप चालक इलीयास सुलतान बागवान (वय ४४) यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विलास जगताप (रा. मालेगाव), मोहंमद शफीक मोहंमद रफीक (रा. मालेगाव) व महेश भामरे (रा. तांदळवाडी, ता. सटाणा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०५, २०४, १२६(२), ३०९(६), ३०८(२), १४०(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी इलीयास बागवान हे महिंद्रा कंपनीची एम एच -१५-एच, एच -८८६१ क्रमांकाची पिकअप गाडी भाडेतत्त्वावर चालवून उदरनिर्वाह करतात. पिंपळगाव वाखारी (ता. देवळा) येथील जब्बार तांबोळी हे त्यांचे ओळखीचे असल्याने ते अनेकदा मालवाहतुकीसाठी त्यांच्याकडे जात असत.
दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी जब्बार तांबोळी यांनी फोन करून गुजरात येथे जायचे असल्याने पिंपळगाव येथे बोलावले. त्यानुसार बागवान पिकअप गाडी घेऊन पिंपळगाव येथे गेले. तेथून दोघेही पिकअप घेऊन कळवण – कनाशी – सापुतारा मार्गे सांमगव्हाण (गुजरात) येथे गेले. तेथे तांबोळी यांनी गाडी थांबवून स्वतः गाडी घेऊन पुढे गेले व रात्री पुन्हा गुटख्याचा माल भरून परत आले.

रात्री साडेअकराच्या सुमारास पिंपळगावकडे परत येत असताना कळवण परिसरात एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. दि. १२ मार्च रोजी रात्री सुमारे १२.१० वाजता भऊर फाटा परिसरात स्कॉर्पिओने पिकअपला ओव्हरटेक करून गाडी अडवली. स्कार्पिओ मधून
उतरलेल्या दोघांनी जब्बार तांबोळी यांना मारहाण करून जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवले, तर फिर्यादी चालक बागवान यांनाही बळजबरीने त्याच गाडीत बसवले. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पिकअप गाडी स्वतः चालवत पुढे नेली.
भऊर, खामखेडा, मांगबारी मार्गे प्रथमेश वाईन शॉपजवळील मोकळ्या जागेत दोन्ही गाड्या उभ्या करून आरोपींनी स्वतःला ‘आयजी स्कॉडचे पोलीस’ असल्याचे सांगितले. पिकअपमधील माल तपासून “गाडीमध्ये गुटखा आहे, केस टाळायची असेल तर २५ लाख रुपये द्या,” अशी मागणी जब्बार तांबोळी यांच्याकडे केली.
यानंतर जब्बार तांबोळी यांनी आरोपींशी बोलणी करून ११ लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यांनी मुलगा साहील याला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. साहील हा पिंपळगावचे उपसरपंच नदीश थोरात व मित्र महेंद्र पाटील, अमोल पाटील यांच्यासह दोन गाड्यांमध्ये पैसे घेऊन निघाला.
दरम्यान आरोपींनी बागवान व तांबोळी यांना विविध ठिकाणी फिरवत शेवटी ठेंगोडा जवळील निर्मल नर्सरी परिसरात नेले. पहाटे सुमारे २.१५ वाजता साहील व त्याचे सहकारी तेथे पोहोचले. पैसे देण्याबाबत चर्चा सुरू असताना आरोपी व तांबोळी यांच्यात वाद झाला.

यावेळी तांबोळी यांनी “मला अस्वस्थ वाटत आहे, छातीत दुखत आहे,” असे सांगून थोडा वेळ बसू देण्याची विनंती केली. मात्र आरोपींनी त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तांबोळी अचानक खाली बसले व काही क्षणातच बेशुद्ध पडले.
तांबोळी बेशुद्ध पडल्याचे पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत स्कॉर्पिओ सोडून पळून गेले. त्यानंतर साहील व इतरांनी तांबोळी यांना उपचारासाठी सटाणा येथील डॉ.प्रकाश जगताप यांच्या खाजगी दवाखान्यात नेले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी विलास जगताप, मोहंमद शफीक मोहंमद रफीक व महेश भामरे यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी, दमदाटी व मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा देवळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिरसाठ व नितीन बारहाते करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध