Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ मार्च, २०२६

व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार सोहळा उत्साहात विकासात्मक धोरणांसाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा, मंगलप्रभात





महाराष्ट्र भूषण’ व ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ पुरस्कारांचे वितरण

बापू चव्हाण दिंडोरी 

         विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद पत्रकारितेमध्ये आहे. त्यामुळे विकासात्मक धोरणांना चालना देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा,असे मत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. तर पत्रकारिता ही समाजाचा खरा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन ओमप्रकाश शेटे यांनी केले.
 ‌ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण” सन्मान प्रदान करण्यात आला,तर सकारात्मक व समाजाभिमुख पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाच्या ‘आयुष्यमान भारत मिशनचे,अध्यक्ष ओमप्रकाश शेटे होते.प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
        यावेळी बोलताना लोढा यांनी पत्रकारितेची समाजातील भूमिका अधोरेखित करताना विकासात्मक धोरणांना चालना देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.समाजातील सकारात्मक कामांना प्रोत्साहन देणे ही पत्रकारितेची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकार हा समाजाचा खरा आधारस्तंभ असून लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर,मुंबईचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी,पुढारी मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसन्ना जोशी, लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक विशाल पाटील आणि जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे आदी उपस्थित होते.
सवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले अशोक काकडे यांनी सन्मान स्वीकारताना सांगितले की, “‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रशासन आणि माध्यमे यांचे परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पत्रकारांनी लोकांच्या समस्या पुढे आणून शासनाला योग्य दिशा देण्याचे काम सातत्याने केले आहे.या सन्मानामुळे समाजासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.” तर ग्रामीण शिक्षणात क्रांती करणारे शिवराज पाटील होटाळकर यांनी सन्मान स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. समाजासाठी केलेल्या कामाची अशी दखल घेतली जाणे ही अभिमानाची बाब आहे.या सन्मानामुळे पुढील काळात अधिक जबाबदारीने आणि समर्पणाने समाजकार्य करण्याची उर्जा मिळाली आहे.”
      या प्रसंगी अनेक विशेष उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. आयुष्यमान कार्ड वाटपाचा प्रारंभ, “पत्रकार मित्र दवाखाना” या उपक्रमाची घोषणा, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संस्थेच्या,संघटनेच्या विशेष गीताचे प्रकाशन, संदीप काळे यांच्या तीन पुस्तकांचे तसेच लेखक व समुपदेशक जाजू यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच महिला कार्यकारिणी पोस्टरचे अनावरण,“यंदा तरी पावसाने” या गाण्याचा शुभारंभ आणि व्हॉईस ऑफ मीडिया संस्थेच्या नव्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमात गायक अतुल दिवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अन्न अमृत फाउंडेशनचे गोरक्षनाथ गंभीरे आणि आदिवासी भागात सामाजिक कार्य करणारे सर्वपरिचित असणारे राणा सूर्यवंशी यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण देऊन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे-देशमुख,प्रबोधनकार सत्यपालजी महाराज,सारडा कचरू हिरालाल, शिवराज पवार पाटील होटाळकर आणि प्रा.डॉ.सविता गिरे पाटील यांचा गौरव करण्यात आला.
 हा सन्मान ओमप्रकाश शेटे, मंगलप्रभात लोढा,महेंद्र कल्याणकर, महेश पाटील,राणा सूर्यवंशी,प्रसन्ना जोशी,विशाल पाटील,प्रसाद काथे, यांच्या हस्ते हा सन्मान झाला.
याचबरोबर सकारात्मक पत्रकारितेसाठी राज्यातून कुणाल लाडे,संदेश साळुंके,शाहिद पठाण, रुपेश बाजड,राहुल पवार,स्वप्निल कांबळे,ईश्वर महाजन,महेंद्रसिंग गिरासे,भारत सवणे,विनोद कांबळे, लियाकत पठाण,सारिका शिंदे (ठाणे),संदीप पिंपळकर (वाशिम), महेश जगताप (पुणे) आणि मल्हारी ओमासे (सांगली) या पत्रकारांना पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अनिल म्हस्के यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला यांच्या हस्ते अनिल म्हस्के यांना निवड पत्र देण्यात आले.    
कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल म्हस्के यांनी केली.महेश पाटील,प्रसन्ना जोशी,विशाल पाटील आणि प्रसाद काथे यांनी पत्रकारितेच्या बदलत्या भूमिकेवर मनोगत व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यातून दीड हजार पत्रकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते. 

‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “महाराष्ट्र भूषण” सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध