Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

शिरपूरमध्ये जमीन घोटाळ्यांची मालिका सुरूच; उंटावद शिवारातील प्रकरणाने खळबळ



शिरपूर प्रतिनिधी:- तालुक्यातील जमीन व्यवहारांमधील घोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच उघडकीस आलेल्या उंटावद शिवारातील आदिवासी जमिनींच्या व्यवहाराने शिरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासींच्या नावावर असलेल्या जमिनींवर गैर -आदिवासी व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या डल्ला मारल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या व्यवहारात महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशयही व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उंटावद शिवारातील काही आदिवासी कुटुंबांच्या मालकीच्या जमिनींची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून दस्तऐवज तयार करण्यात आल्याचे आरोप आहेत. या प्रक्रियेत नियमांना बगल देत जमिनींचे व्यवहार करण्यात आले असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्थानिक स्तरावर या प्रकरणाची तक्रार संबंधित विभागाकडे करण्यात आली असून नावासहित काही संशयित व्यवहारांची माहिती महसूल विभागापर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठे जमीन रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शिरपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून आदिवासी जमिनींवर बेकायदेशीर व्यवहारांची मालिका सुरू असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. त्यामुळे उंटावद शिवारातील हा नवीन प्रकार समोर आल्याने महसूल प्रशासनाची भूमिका आणि जमीन व्यवहारांवरील नियंत्रणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर योग्य चौकशी झाली तर शिरपूर तालुक्यातील अनेक संशयास्पद जमीन व्यवहारांचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(या प्रकरणाचा सविस्तर खुलासा पुढील भागात...)






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध