Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १५ मार्च, २०२६

राज्यात ३० लाख कोटींची गुंतवणूक, पनवेल-पेणसह रायगडच्या विकासाला मोठी चालना आमदार विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत मांडले आपले मनोगत



कांतीलाल पाटील : नवी मुंबई प्रतिनिधी
मुंबई, दि.१३ : राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी आकर्षणाचे केंद्र बनत असल्याचे मत विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेत व्यक्त केले. डावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेत मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ३० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात यश मिळाले असून ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानपरिषदेत प्रस्ताव क्रमांक २६० वर बोलताना आमदार पाटील म्हणाले की, परदेशी गुंतवणुकीमुळे राज्यात उद्योगांची वाढ होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. उद्योगांसोबतच लघुउद्योग, स्टार्टअप्स आणि स्थानिक व्यवसायांना देखील चालना मिळून एक मजबूत आर्थिक परिसंस्था तयार होईल.
या गुंतवणुकीपैकी एक लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक पनवेल-पेण परिसरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेण ग्रोथ सेंटर, इनोव्हेशन सिटी, एज्यु सिटी, मेडिसिटी यांसारख्या प्रकल्पांमुळे या परिसराचा वेगाने विकास होणार असून ‘तिसरी मुंबई’ ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पनवेल, पेण आणि उरण तालुक्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी बंदर, डेटा सेंटर्स तसेच नैनासारखे महत्त्वाचे प्रकल्प उपलब्ध झाल्यामुळे रायगड जिल्ह्याचे भौगोलिक आणि आर्थिक महत्त्व वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांमुळे कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, विकास प्रकल्प राबवताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेणे अत्यावश्यक असल्याचेही आमदार पाटील यांनी अधोरेखित केले. नैना प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अधिकाऱ्यांकडून योग्य संवाद न झाल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भविष्यात तिसऱ्या मुंबईसारखे प्रकल्प राबवताना स्पष्ट नियोजन, पारदर्शक प्रक्रिया आणि शेतकऱ्यांशी सतत संवाद ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रायगड जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी स्वागत करत सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध