Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ एप्रिल, २०२६

नामदार झिरवाळ यांची दरगोडे कुटुंबाला सांत्वन भेट.


 शासनाकडून ४५ लाखांची तातडीची मदत

बापू चव्हाण दिंडोरी :-

       दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील दरगोडे कुटुंबावर ओढवलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी सिताराम झिरवाळ यांनी संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली.या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांच्या भावना जाणून घेत त्यांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
       दिंडोरी येथील शिवाजीनगर परिसरात विहिरीत कार कोसळून झालेल्या या भीषण अपघातात इंदोरे येथील ३ मोठे व्यक्ती व ६ विद्यार्थी असे दोन कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.या घटनेने इंदोरे गावावर व तालुक्यावर दुःखाचे सावट दाटून आले असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
 ‌‌ दरम्यान शासनाच्यावतीने मदत प्रक्रियेला तातडीने गती देण्यात आली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून,प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित मृत्यू झालेल्या प्रति व्यक्ती ५ लाख याप्रमाणे वारसांच्या बँक खात्यात एकूण सुमारे ४५ लाख रुपयांची मदत अल्पावधीतच जमा करण्यात आली आहे.नामदार झिरवाळ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्यात येईल,असे आश्वासन दिले.तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कुटुंबीयांना काही अडचण असल्यास तात्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
      यावेळी दिंडोरी-पेठ उपविभागीय अधिकारी डॉ.आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे,क्रांतिवीर व्ही.एन.नाईक संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक,ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे,संचालक शरद बोडके यांच्यासह पदाधिकारी,ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध