Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

“वाळू माफियांविरोधात सोशल मीडियावर गर्जना करणारे मा.आमदारच आता सहभागी? अमळनेरमध्ये सात वाळू ठेक्यांवरून खळबळ!”



अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यात सध्या वाळू वाहतूक पुन्हा एकदा जोरात सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात वाळू माफियांविरोधात आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेले आमदार आता स्वतःच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
निवडणुकीदरम्यान “अमळनेर तालुक्यात वाळू माफियांना थारा दिला जाणार नाही, ठेके होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका जाहीरपणे मांडण्यात आली होती. मात्र, सध्याच्या घडीला तालुक्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सात वाळू ठेके मंजूर झाल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, हे ठेके नेमके कोणाच्या हस्ते आणि कोणाच्या आश्रयाने चालवले जात आहेत, याबाबत स्थानिकांमध्ये कुजबुज सुरू आहे.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पूर्वी ज्या वाळू माफियांविरोधात आवाज उठवला जात होता, त्यांच्याच गोटात काही राजकीय नेते सहभागी असल्याचे आरोप स्थानिक पातळीवर होत आहेत. त्यामुळे “माफियांविरोधी भूमिका ही केवळ निवडणुकीपुरतीच होती का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, वाळू वाहतुकीमुळे पर्यावरणीय हानी, रस्त्यांची दुर्दशा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होत आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात संबंधित आमदार आणि प्रशासन यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. अन्यथा, “बोलणं एक आणि करणं दुसरं” असा संदेश जनतेमध्ये जात असून, लोकप्रतिनिधींच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध