Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १९ एप्रिल, २०२६

शिरपूरमध्ये नाल्यावर अतिक्रमण; भू-माफियांचा डाव, प्रशासनावर संगनमताचा संशय



शिरपूर प्रतिनिधी:- शहरातील वरझडी रोड परिसरात भू-माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढत नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पाणी फिल्टर प्लांटसमोरील नाल्यात माती व मुरूम टाकून तो बुजवण्याचा प्रयत्न सुरू असून, या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नाला हा वरझडी नाक्यापासून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तसेच परिसरातील सांडपाण्याचा मुख्य प्रवाह मार्ग होता. अनेक वर्षांपासून या नाल्यातून पाणी निमझरीकडे वाहत होते.

मात्र, सन 2019-2020 दरम्यान भू-माफियांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रक, डंपर आणि बुलडोझरच्या सहाय्याने हा नैसर्गिक नाला बुजवून टाकला. त्यानंतर नाल्याचा मूळ प्रवाह जबरदस्तीने बदलत तो दक्षिणेकडे वळवण्यात आला. पुढे त्या ठिकाणी काँक्रीटची भिंत उभारून कृत्रिम ‘एल-आकाराचा’ नाला तयार करण्यात आला, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या फेरबदलानंतर त्या परिसरात प्लॉटिंग करून जागा विक्री केल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दि. 18 एप्रिल रोजी पुन्हा एकदा या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा प्रकार घडल्याचे नागरिकांनी सांगितले. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर डंपर व जेसीबीच्या सहाय्याने नाल्यात मुरूम टाकून तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही तासांतच नैसर्गिक जलवाहिनी नष्ट करून सपाट जमीन तयार करण्याचा प्रकार उघडपणे सुरू असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, हा नाला व त्यालगतची जमीन पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असल्याचे सांगितले जात असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर काम सुरू राहणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

नाला पूर्णपणे बुजवल्यामुळे पावसाळ्यात पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ शकते, तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी “नगरपालिका कुठे आहे?” असा सवाल उपस्थित केला असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून अतिक्रमण हटवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच, या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून भू-माफिया व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
दरम्यान, तालुक्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याने भू-माफियांना राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध